Breaking

Dhad Rural hospital : आक्रमक ‘प्रहार’; आरएमओ, वैद्यकीय अधीक्षकांना रुग्णालयात कोंडले !

Protest against RMO, Medical Superintendent at the hospital: धाड ग्रामीण रुग्णालयातील बेपर्वा आरोग्य यंत्रणेवर हल्लाबोल

Buldhana : धाड येथील ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने संतप्त प्रहार जनशक्ती पक्षाने मंगळवारी (९ एप्रिल) आक्रमक भूमिका घेत रुग्णालयाचा ताबा घेतला. जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रहरी’ कार्यकर्त्यांनी आरएमओ आणि वैद्यकीय अधीक्षकांना तब्बल सहा तास रुग्णालयातच कोंडून ठेवले.

या आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी घटनास्थळी येत तातडीने चर्चा केली. त्यांनी लेखी आश्वासन देत बेबी वॉर्मर आणि मॉड्युलर प्रसूतीगृह तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. याशिवाय दंत चिकित्सकाची जागेवरच प्रतिनियुक्ती केली आणि सोनोग्राफी मशीन, एक्स-रे मशीन, ऑक्सिजन प्लांट आणि शवपेटी १५ दिवसांत कार्यान्वित करण्याचे वचन दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

रुग्णालय की समस्यालय ?
धाड ग्रामीण रुग्णालयावर ५२ गावांसह मराठवाड्याच्या काही भागांची आरोग्यसेवा अवलंबून आहे. मात्र येथे एक्स-रे, सोनोग्राफी, दंत तपासणी यंत्रणा आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांचा अभाव आहे. बेबी वॉर्मर आणि ऑक्सिजन प्लांट असूनही तांत्रिक मनुष्यबळाअभावी ती यंत्रणा निष्क्रिय आहेत. ब्लड स्टोरेजसाठी फ्रिज असूनही तंत्रज्ञ नसल्याने तेही बंद आहेत. गेल्या वर्षभरापासून मॉड्युलर प्रसूतीगृह बंद आहे, तर शवपेटीही उपलब्ध नाही.

Eknath Shinde : काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा!

या सगळ्या प्रश्नांवर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, केवळ कागदी कारभार चालू ठेवून प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने आंदोलन सुरू करण्यात आले.

प्रशासन जागेवर आले पाहिजे..
प्रशासनाने वेळेत कार्यवाही केली नाही, म्हणून आम्ही हे पाऊल उचलले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले असले तरी दिलेल्या मुदतीत समस्या मार्गी लागल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मोहिते यांनी दिला.

Eknath Shinde : काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा!

रुग्णसेवेवर परिणाम नाही..
विशेष म्हणजे, आंदोलन सुरु असताना रुग्णसेवेत कोणताही व्यत्यय येऊ नये, याची पूर्ण दक्षता आंदोलकांनी घेतली. त्यामुळे रुग्णालयातील सेवा सुरळीत सुरू राहिल्या. या आंदोलनात वैभवराजे मोहिते, प्रदीप टाकसाळ, सुनील वाघ, गणेश जाधव, सोनू वाघ, पिंटू उबाळे, विशाल विसपुते, ऋषी वाघ, पवन बामदळे, प्रदीप तायडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.