Clashes between two groups of BJP : सभापती निवडीनंतर गोंधळ; पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर
Khamgaon कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीची निवड झाली. एकीकडे आनंदाचे वातावरण होते. उत्साहाचे वातावरण होते. त्याचवेळी भाजपचेच दोन गट एकमेकांसोबत भिडले. धक्काबुक्की झाली. समितीच्या संचालकांमध्ये झालेली ‘फ्री स्टाईल’ बघण्याचा आनंद काही लोक लुटत होते. पण या प्रकारामुळे भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
समिती सदस्यांमधून सभापतीपदी संजय काजळे यांची अविराेध निवड झाली. त्यानंतर भाजपच्या दाेन गटांत वाद झाला. बाजार समितीच्या संचालकांमध्ये सभागृहातच धक्काबुक्की झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. आमनेसामने आलेल्या कार्यकर्त्यांना आवरल्यामुळे अनर्थ टळला. पण या प्रकारामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हा प्रकार भाजपसाठी त्रासदायक ठरू शकतो.
Gondia Zilla Parishad : अध्यक्षाचे नाव नागपुरातून बंद लिफाफ्यात येणार !
सहा महिन्यांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती शिवचंद्र तायडे यांच्यावर अन्य सदस्यांनी अविश्वास आणला. अविश्वासाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या न्यायप्रविष्ट प्रकरणाचा निकाल लागला. त्यानंतर बाजार समिती सदस्यांमधून सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यासी अधिकारी म्हणून महेश कृपलानी यांनी प्रक्रिया केली.
सभापतीपदाकरिता प्रारंभी सदस्य संजय काजळे व दुसऱ्या गटाकडून योगेश पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत योगेश पाटील यांनी माघार घेतली. त्यामुळे अध्यासी अधिकाऱ्यांनी संजय काजळे यांची सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रक्रियेत उपसभापती नागो राणे, शिवचंद्र तायडे, साहेबराव पाटील, सुभाष पाटील, श्रीकृष्ण खापोटे, ज्ञानदेव वाघोदे, विजय साठे, भगवान चोपडे, मधुकर फासे, अमोल शिरसाट, प्रीती नारखेडे, नंदा पाटील, सुनील अग्रवाल, कुंदन चांडक, योगेश पाटील यांच्यासह सर्व संचालक सहभागी झाले होते.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार चैनसुख संचेती यांनी नवनियुक्त सभापती संजय काजळे यांचा सत्कार केला. भाजप पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील काजळेंचा सत्कार करत होते. त्याचवेळी सभागृहाच्या बाजूच्या कॅबिनमध्ये बसलेले माजी सभापती शिवचंद्र तायडे यांनी थेट सभागृह गाठले. भाजपाचे भगवान पाटील यांच्याबराेबर वाद घातला. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने उभे ठाकले.
यावेळी संचालकांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याची माहिती आहे. हमरीतुमरीचा आवाज वाढताच पीएसआय सुरेश रोकडे दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना वेळीच आवरले. यावेळी पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली.