Anil Deshmukh : शेतकऱ्याच्या आत्महत्येची साधी चौकशीही नाही, अनिल देशमुखांची खंत !

Anil Deshmukh Writes a letter  to Devendra Fadnavis Over Farmer Suicides : शासकीय मदत करण्यासाठी सहकार्य करावे

Nagpur : नागपूर जिल्ह्याच्या खडकी येथील शेतकरी प्रशांत बाबाराव खरपकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर तीन दिवस उलटूनही पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी साधी चौकशीही केलेली नाही. ही बाब खरपकर कुटुंबीयांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सांगितली. त्यांनी लगेच भेट देत खरपकर कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि अधिकाऱ्यांच्या अशा बेजबाबदारपणाच्या वागणुकीवर खंत व्यक्त केली.

अनिल देशमुख यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये ते म्हणतात, प्रशांत खरपकर यांच्या आत्महत्येची चौकशी करून त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यासाठी सहकार्य करावे. दररोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या गंभीर विषयावर प्रशासन गंभीर नाही. ३१ ऑगस्ट रोजी प्रशांत खरपकर यांचा नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर जलालखेडा येथील स्टेट बॅंकेचे एक लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज होते. त्याशिवाय घरातील सोने गहाण ठेऊन ६० हजार रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले होते.

Anjali Krishna Threat Case : अजित दादांच्या मदतीला सरसावले चंद्रशेखर बावनकुळे !

खासगी वित्तीय संस्था, नातेवाईक आणि मित्रांकडूनही त्यांनी कर्ज घेतले होते. जवळपास चार लाख २५ हजारांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर झाले होते. यात तणावातून त्यांनी आत्महत्या केली. ३१ ऑगस्ट रोजी मृत्यू झाल्यानंतरही पोलिस विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी पंचनामा करण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी गेला नाही. या घटनेची माहिती वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित झाली आणि स्थानिक नागरिकांनी जलालखेडा पोलिस स्टेशनला दिली. खडकी हे गाव जलालखेडा पोलिस स्टेशनपासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे. तरीही कुणीही या घटनेची दखल घेतली नाही, याबद्दल अनिल देशमुख यांनी पत्रात खंत व्यक्त केली आहे.