Rapid Response Team to prevent bird flu : पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट मोड’वर; जिल्ह्यात दोन लाख कुक्कुट पक्षी
Wardha राज्यातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. तर वर्धा जिल्ह्यात अजूनही शिरकाव झालेला नाही. तरीदेखील या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. यासाठी ८ ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ Rapid response Team तयार करण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात सुमारे दीड ते दोन लाख कुक्कुट पक्षी असून, ते सुरक्षित आहेत.
जिल्ह्यात आठ ते दहा वर्षांपूर्वी बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला होता. त्यावेळी कुक्कुट पक्षी मृत झाले होते. यात व्यावसायिकांचेही आर्थिक नुकसान झाले हाते. सध्या तरी जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव झाला नाही. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून, त्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बर्ड फ्ल्यू हा कुक्कुट पक्ष्यांना विषाणूमुळे होणारा रोग असून, संसर्गजन्य आहे. यात सर्वात संसर्गजन्य ‘स्ट्रेन एच ५ एन १’ आहे. ‘एव्हिएन इन्फ्ल्युएन्झा’ Avian influenza या विषाणूचे अ, ब, क असे तीन प्रकार आहेत. अ विषाणू हा कुक्कुट पक्षी, अन्य पक्षी, प्राणी तसेच मानवांमध्ये आढळत आहेत. विषाणू बी व सी फक्त मानवांमध्ये आढळतो. या विषाणूद्वारे रोग उद्भवण्याचा कालावधी २४ तास ते १४ दिवसांचा आहे. या विषाणूचा प्रसार एका कुक्कुट पक्ष्यातून दुसऱ्या कुक्कुट पक्ष्यांमध्ये मुख्यत: हवेतून व स्थलांतरित पक्षी, वन्य पक्ष्यांच्या माध्यमातून होतो.
भूक मंदावणे, उदासिनता, अंडी उत्पादन कमी होणे, शिंकणे व खोकणे, डोळ्यातून पाणी येणे, डोक्यावर सूज येणे, पंख नसलेला भाग निळसर पडणे, ही या रोगाची लक्षणे आहेत. आहाराच्या पद्धती लक्षात घेता तसेच अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास या रोगाचा विषाणू निष्क्रीय होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
Devendra Fadnavis Krushna Khopde : खोपडेंची मागणी मंजूर; नागपुरात आणखी एक Police station!
बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून अधिकाऱ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. आठही तालुक्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना या ग्रुपमधून आवश्यक त्या सूचना केल्या जात आहेत. पक्ष्यांमध्ये असाधारण मृतक दिसून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क करावा. मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करू नये, परस्पर विल्हेवाट लावू नये, असेही सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास ३५ ते ४० पोल्ट्री फार्म असून, सुमारे दीड ते दोन लाख कुक्कुट पक्षी असल्याची माहिती आहे. सर्व पक्षी सुरक्षित आहेत.