105 MLAs submit a memorandum to the government for flower farmers : फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी,105 आमदारांचे सरकारला निवेदन
Mumbai : कृत्रिम आणि प्लास्टिकच्या फुलांचा बाजार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहे. शिवाय कृत्रिम फुलांचा वर घातक अशा प्रकारचे रसायन युक्त रंग वापरलेले असतात. ते शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी अनेक आमदारांनी अधिवेशनात केली. आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वात 105 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले असून, या प्रश्न तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आमदार रोहित पाटील कृत्रिम फुलावरील बंदीसाठी 105 आमदारांच्या सहीसह पाठिंबा पत्र जोडत फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एक निवेदनही दिले आहे.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत लवकरच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विशेष म्हणजे मंत्री गोगवले यांनी देखील शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, असे आश्वासन सभागृहात दिलेले आहे.
आ.रोहित पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सर्रासपणे प्लॅस्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतीतील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून ही फुले बाजारात अत्यल्प दरात विक्री होत आहेत. शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्लॅस्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याप्रमाणे या प्लॅस्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे.
द्राक्षपिक व इतर फळपिकांना पर्यायी व्यापारी पिक म्हणून फुलशेती केली जाते. या फुलशेतीसाठी लागणारी औषधे, मजुरी व ट्रान्सपोर्ट खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध आणून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणेसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.शेतकऱ्यांच्या उत्पन्नाव त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर प्लास्टिक फुलांमुळे गंभीर परिणाम होत आहे. ही बाब पण या निवेदनाच्या माध्यमातून लक्षामध्ये आणून दिली आहे.
Mahayuti : कार्यकर्त्यांच्या मनात ‘घड्याळ’, सिंदखेडराजात भाजपची पडझड?
दरम्यान या मागणीला विधिमंडळातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील तब्बल 105 आमदारांनी स्वाक्षरी देऊन पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या विषयावर तातडीने बैठक घेण्याचे आश्वस्त केले आहे. शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, कृत्रिम फुलांमुळे शेतकरी वर्गाला फटका बसतो. तसेच यामुळे रासायनिक कलरचाही वापर मोठ्या प्रमाणात होतो ते थांबवले जाईल असे भरत गोगावले यांनी व्यक्त केले आहे.आ. महेश शिंदे यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थित करत हा मुद्दा चर्चेला आणला होता.