Government competitor to Ola-Uber, app in Marathi too : ओला-उबरला सरकारी स्पर्धक, मराठीतही ॲप
New Delhi : देशातील प्रवासी वाहतुकीत क्रांती घडवणारा एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ओला-उबरसारख्या खाजगी कंपन्यांच्या टॅक्सी सेवेला आता सरकारी स्पर्धक मिळणार आहे. सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई-शासन विभागाच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा ‘भारत टॅक्सी’ सुरू होत आहे. या सेवेला देशभरात डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये ६५० चालकांसह पायलट प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यापासून भारत टॅक्सी इतर राज्यांमध्ये विस्तारेल.
भारत टॅक्सी ही पूर्णपणे ॲप-आधारित सेवा असून ती डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग आहे. ही सेवा सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड या संस्थेद्वारे चालवली जाणार आहे. या संस्थेची स्थापना यंदाच्या जून महिन्यात ३०० कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आली होती. या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता असतील, तर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे उपव्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता हे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील. विविध सहकारी संस्थांशी संबंधित आठ इतर सदस्य या मंडळात आहेत. या कौन्सिलची पहिली बैठक १६ ऑक्टोबर रोजी झाली होती.
Defender for MLAs : सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराकडून डिफेंडरची दिवाळी भेट
या सेवेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे चालक सुद्धा या सेवेचे सह-मालक असतील. म्हणजेच, प्रत्येक चालकाला आपल्या उत्पन्नावर संपूर्ण हक्क असेल. प्रवासातून मिळणाऱ्या प्रत्येक राईडचे १०० टक्के पैसे चालकाकडेच जातील. त्यांना केवळ निश्चित दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक शुल्क सरकारला भरावे लागेल. त्यामुळे ओला-उबरसारख्या कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या मोठ्या कमिशनचा बोजा चालकांवर पडणार नाही. हा एक सहकारी तत्वावर आधारित आणि चालकहितासाठी तयार केलेला अभिनव मॉडेल आहे.
local body elections : वंचितच्या किल्ल्यावर भाजपचा डोळा, आव्हान पेलवणार?
भारत टॅक्सीचं ॲप ओला आणि उबरसारखंच असेल. नोव्हेंबर महिन्यात ते अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ॲप स्टोअरवर उपलब्ध होईल. विशेष म्हणजे ते हिंदी, गुजराती, मराठी आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे विविध राज्यांतील वापरकर्त्यांना या सेवेचा लाभ घेणं अधिक सोपं होणार आहे. प्रवाशांना टॅक्सी बुक करणं, चालकांची माहिती पाहणं आणि पेमेंट करणे या सर्व सुविधा एका क्लिकवर मिळतील.
भारत टॅक्सीमध्ये महिला चालकांसाठी देखील एक विशेष योजना आणली आहे. या योजनेला ‘सारथी’ असं नाव देण्यात आलं असून पहिल्या टप्प्यात १०० महिला चालक या सेवेचा भाग असतील. २०३० पर्यंत या महिला सारथींची संख्या १५,००० पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. महिलांना १५ नोव्हेंबरपासून मोफत प्रशिक्षण आणि विशेष विमा सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे ही सेवा महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.
Vidarbha farmers : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत व सरसकट कर्जमाफी द्या
डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या काळात राजकोट, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये ही सेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यात ५ हजार चालक भारत टॅक्सीशी जोडले जातील. त्यानंतर एप्रिल ते डिसेंबर दरम्यान लखनौ, भोपाळ आणि जयपूर येथे ही सेवा उपलब्ध होईल आणि चालकांची संख्या १५ हजारांवर जाईल. २०२७-२८ दरम्यान देशातील २० प्रमुख शहरांमध्ये ५० हजार चालकांसह ही सेवा कार्यरत असेल आणि ती फास्टॅगशी जोडली जाईल. २०२८ ते २०३० दरम्यान भारतातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि ग्रामीण भागात भारत टॅक्सी उपलब्ध होईल. त्यावेळी चालकांची संख्या एक लाखांपर्यंत पोहोचेल.
Local Body Elections : सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपची धडपड, बैठकांचे सत्र!
सध्या देशात ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्या टॅक्सी सेवा देतात, पण सुरक्षेच्या समस्या, चालकांच्या असुरक्षित कामकाजाच्या अटी आणि जास्त कमिशन याबाबत तक्रारी कायम आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारची भारत टॅक्सी सेवा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सहकारी पद्धतीवर आधारित ठरणार आहे. चालकांना नफा आणि मालकी दोन्ही मिळणार असल्याने त्यांचं आर्थिक स्वावलंबन वाढेल. तसेच प्रवाशांनाही सरकारी नियंत्रणाखालील सुरक्षित सेवा उपलब्ध होईल.
थोडक्यात सांगायचं झालं तर, भारत टॅक्सी हा केवळ एक प्रवासी सेवा उपक्रम नाही, तर तो सहकारी अर्थव्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. “सहकारावर आधारित, सुरक्षित आणि स्वदेशी भारत टॅक्सी” या घोषवाक्याखाली केंद्र सरकारने देशातील प्रवासी वाहतुकीला नवी दिशा देण्याची तयारी केली आहे.
____








