BJP leaders question to MLA : भाजप नेत्याचा आमदाराला डीवचणारा प्रश्न
Buldhana : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीच्या दोन प्रमुख घटक. म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. दीड कोटी रुपयांच्या लक्झरी लँड रोव्हर डिफेंडर कारवरून वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी थेट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजपचाच विचार झाला तरच युती शक्य आहे. काल एका लोकप्रतिनिधीने दीड कोटी रुपयांची डिफेंडर आणली आहे. ती एका ठेकेदाराच्या नावावर आहे. ती कार कोणत्या कामातील कमिशनमधून मिळाली याची चौकशी व्हावी,” अशी मागणी विजय शिंदे यांनी केली.
ते म्हणाले की, “मतदारांना वेश्येपेक्षा वाईट म्हणणाऱ्या या लोकप्रतिनिधीला आता जनता नाकारेल. बुलढाण्यात भाजपचाच विचार व्हावा, अन्यथा युती शक्य नाही.” या विधानामुळे बुलढाण्यातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले आहे.
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, “बुलढाण्यात शिवसेना आणि भाजप युती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि युती होईल अशी आशा आहे. भाजपने अद्याप ‘एकला चलो रे’चा नारा दिलेला नाही. चर्चा झाल्यानंतर जे ठरेल ते मान्य करू. पण बुलढाण्यात मोठा भाऊ मीच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Sharadchandra Pawar : कापूस, सोयापेंडची निर्यात वाढवा म्हणत राष्ट्रवादी आक्रमक !
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महायुतीमध्ये निर्माण झालेल्या या वादामुळे दोन्ही पक्षांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजप आणि शिंदे गटाची युती अखेर होते की नाही, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र बुलढाण्यात महायुतीतील संघर्ष चांगलाच पेटला आहे.