Breaking

Chandrashekhar Bawankule : फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवा

 

Remove encroachments in Futala lake area : महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश

Nagpur फुटाळा तलावाच्या परिसरात अतिक्रमण करून त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम झाल्याच्या मुद्दयावरून राजकारण तापले होते. या प्रकरणात आता महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.
या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्याचप्रमाणे या अतिक्रमणांसाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

नागपूरच्या तेलंगखेडी येथील फुटाळा तलावाच्या परिसरात अतिक्रमण झाल्याची तक्रार महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत बावनकुळे यांनी मुंबई मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. यावेळी आमदार विकास ठाकरे उपस्थित होते. सदर जागा जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या मालकीची असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे.

तसेच ३० वर्षे मुदतीकरिता फुटाळा जलाशय परिसर एकात्मीकृत प्रकल्पाकरिता महामेट्रो महामंडळास हस्तांतरित केलेली आहे. या परिसरात महामेट्रो महामंडळामार्फत एकात्मीकृत प्रकल्पांतर्गत विविध कामांचे कार्यान्वयन सुरू आहे. तेलंगखेडी येथे फुटाळा तलाव परिसर तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे.

 

याअनुषंगाने अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संबंधितांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तातडीने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे अतिक्रमणासाठी जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, असे निर्देशही बावनकुळे यांनी दिले आहेत.