Sudhakar Badgujar, Baban Gholap join BJP : सुधाकर बडगुजर, बबन घोलप यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
Mumbai : नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाचा विषय काही दिवसापासून गाजत आहे. आज सकाळी ते प्रवेशासाठी मुंबईकडे निघाले. भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांचा त्यांना विरोध आहे. यातच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवेशाबाबत मला काहीही माहिती नाही असे सांगून खळबळ उडवून दिली होती. मात्र दुपारी त्यांच्याच उपस्थितीत बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप आणि अन्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढल्याचे सांगितले जात आहे. सुधाकर बडगुजर यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पक्षप्रवेशापूर्वी बडगुजर यांनी शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. त्यांच्यासोबत बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला. मी भाजपच्या नेत्यांचे आभार मानतो. मी समाजासाठी झटतो, समाजाची सेवा करतो. कोरोना काळात मी अनेक रक्तदान शिबीरे घेतली. कोणी बाहेर येत नव्हते त्यावेळी मी कोविड सेंटर सुरु केलं. पक्षासाठी काम केलं. परंतू नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल.
Cabinet meeting : कॅबिनेटमध्ये उन्हाळी पिकांच्या नुकसानाचा आढावा !
सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे विश्वासू मानले जातात. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला 2007 मध्ये सुरुवात झाली. ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी बडगुजर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2008 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2009 ते 2012 काळात ते नाशिक महापालिकेचे सभागृहनेते होते. तसेच 2012 ते 2015 या काळात बडगुजर हे महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते.
2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली होता.