Various types of swords, shields, spears, daggers, etc. will be displayed : विविध प्रकाराच्या तलवारी, ढाल, भाले, कटयारी आदी मांडण्यात येणार आहेत
Nagpur : कोट्यवधी नागरिकांचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे पाहण्याची नागपुरकरांना संधी मिळणार आहे. मध्यवर्ती पुरातत्व वस्तुसंग्रहालयात येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयापासून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि शिवशस्त्र शौर्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी याबाबत पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने इंग्लंडकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे निर्धारित कालावधीसाठी प्राप्त केली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील शौर्याची गाथा या वाघनख्यांच्या माध्यमातून नागपूर व परिसरातील युवा पिढीला, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, संशोधकांना व समस्त इतिहास प्रेमींना प्रत्यक्ष अनुभवता यावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.
Local government body : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांच्या अधिकारांचे हनन नाही का?
महामुनी यांनी मध्यवर्ती संग्रहालयास भेट देवून पाहणी केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मध्यवर्ती संग्रहालयाचे अभिरक्षक मयूर खडके, सांस्कृतिक संचालनालय, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संग्रहालयाच्या अस्थायी सभागृहामध्ये वाघनखे आणि शिवशस्त्रशौर्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या सभागृहात व परिसरातही शिल्प दालन व शिलालेखांच्या मांडणीबाबत सुरु असलेल्या तयारीची पाहणी यावेळी करण्यात आली.
या प्रदर्शनात इतिहास तज्ज्ञांचे व्याख्यानेही होणार आहेत. शिवशस्त्र शौर्य प्रदर्शनात विविध प्रकाराच्या तलवारी, ढाल, भाले, कटयारी आदी मांडण्यात येणार आहेत. यासंदर्भातील आवश्यक सूचना महामुनी यांनी दिल्या. जवळपास ८ महिने हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. नागपूर जिल्ह्यासह इतर ठिकाणांहून विविध शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यावेत, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.