Chief minister fund assistance at each collectorate : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; वैद्यकीय मदतीची प्रक्रिया होणार सोपी
MUMBAI राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
या कक्षात सादर झालेल्या अर्जांचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
Kirit Somaiya : दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र!
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कामकाज अधिक सुलभ व पेपरलेस करण्यात येत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च टाळता येणार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत केली जाते. या सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेणे सहज सुलभ व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास प्राप्त झालेल्या अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करुन देणे व समस्यांचे निराकरण करणे.
कक्षामध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज भरण्यास सहाय्य करणे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाबत जनजागृती आणि प्रसिध्दी करणे. जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे. अर्थसाहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे याकरिता राज्यातील तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
यामुळे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने अर्थसहाय्याच्या रकमेचादेखील समितीमार्फत आढावा घेण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) एकत्रित जोडण्यात येणार आहेत.