Female employee attempts suicide due to mental harassment by project director : जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ, सुटीच्या दिवशीही होते कामाचे बंधन
Amravati “उमेद” महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याने, प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्या कथित मानसिक जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला कर्मचाऱ्याची प्रकृती सध्या गंभीर असून, हा प्रकार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) कार्यालयात सुरू असलेल्या प्रशासकीय अराजकतेचे भीषण प्रतिबिंब म्हणून पाहिला जात आहे.
या प्रकाराबाबत पीडितेच्या आईने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून चालू असलेल्या मानसिक त्रासामुळेच मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्या म्हणाल्या. सततचा छळ, मानधनाचा विलंब, सुटीच्या दिवशीही कामाचे बंधन, यामुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती.
Local Body Elections : महापालिका निवडणुकीचा शंखनाद; राजकीय हालचालींना वेग!
पीडितेच्या कुटुंबीयांच्या मते, यापूर्वीही दोन वेळा तिच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तिने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारही केली होती, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळेच अखेर तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचे तिच्या आईचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर “उमेद” कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळाचे पदाधिकारी सक्रिय झाले असून, त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेने जिल्हा परिषद वर्तुळात तीव्र खळबळ उडाली असून, “काही अधिकाऱ्यांच्या तानाशाही वृत्तीला वेळीच आवर घातला नाही, तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात”, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे.
सदर प्रकल्प संचालकांविरोधात केवळ या एकाच कर्मचाऱ्याचाच नव्हे, तर इतर कर्मचाऱ्यांनाही त्रास दिल्याचे आरोप वारंवार होत आहेत. ‘उमेद’ अभियानातील कामात हस्तक्षेप, मनमानी निर्णय, काम न केल्यास मानसिक दबाव आणि अपमानास्पद वर्तन, अशा स्वरूपाचे आरोप या प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आले आहेत. यासंदर्भात प्रकल्प संचालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.