Shocking incident at Kadbi Chowk Nagpur : नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना
Nagpur : शहरातील कडबी चौक परिसरात बुधवारी रात्री भररस्त्यात व्यापाऱ्यावर गोळीबार करून तब्बल 50 लाखांची रक्कम लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला असून, घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. जखमी व्यापाऱ्याचे नाव राजू दिपानी असून ते जरीपटका येथील रहिवासी आहेत. दिपानी हे व्यापारी असून गुजरातमधील एका कंपनीसाठी डेटा फिडिंगचे कामही करतात. त्यांचे कार्यालय 10 नंबर पुलाजवळ आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ते कार्यालयातून दुचाकीवरून निघाले असता ही घटना घडली.
चौकातून आतील भागात शिरताच बाबा नावाच्या व्यक्तीच्या घरासमोरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी दिपानी यांना अडवण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या हातात स्प्रे पाहून दिपानी यांनी धोका ओळखला आणि तिथून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलातून तुफानी गोळीबार केला. तीन गोळ्या झाडल्यानंतर त्यांनी दिपानी यांच्याकडील सुमारे 50 लाख रुपयांची रक्कम हिसकावून घेतली आणि पळ काढला.
Shashikant Shinde : सत्ताधाऱ्यांच्या अवास्तव खर्चामुळे राज्य कर्जबाजारी
या घटनेत दिपानी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून हा प्रकार हवालाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर नागपूर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या थरारक घटनेनंतर व्यापारी व व्यावसायिक वर्तुळात मोठी दहशत पसरली असून, शहरात सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.