Sanjay Raut says both parties are different, it is impossible to come together : संजय राऊत म्हणतात, दोन्ही पक्ष वेगळे, एकत्र येणं अशक्य
Mumbai : यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र दिसणार का, अशा चर्चेला रंग चढला आहे. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याबाबत सचिन अहिर यांनी दिलेल्या संकेतांमुळे उत्सुकता वाढली असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या शक्यतेला पूर्णविराम दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, “दसरा मेळाव्यात एकत्र येण्याबाबत मला काही माहिती नाही. पण एवढं नक्की सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे. दसरा मेळावा हा परंपरेने शिवसेनेचाच असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला स्वतंत्र मेळावा असतो. त्यामुळे या व्यासपीठावर दोघे एकत्र येणं शक्य नाही. दोन्ही पक्ष वेगळे आहेत. मात्र, भविष्यात एकत्र काम करण्यासाठी आमची सहमती आहे. शिवतीर्थाचा दसरा मेळावा हा साठ वर्षांहून अधिक काळ फक्त शिवसेनेचाच राहिला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Medical College : मुलांचे बालपण वाचवण्यासाठी साथ द्या, डॉ. अविनाश गावंडे यांचे आवाहन !
याआधी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी मोठं विधान केलं होतं. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं ही केवळ दोन पक्षांची नव्हे, तर राज्याच्या हिताची गरज आहे. हे जनतेच्या मनातील प्रतिबिंब आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर येणाऱ्या दसऱ्याला ‘चांगली बातमी’ मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले होते.
अहिर यांनी पुढे सांगितले की, “दसरा मेळावा केवळ राजकीय कार्यक्रम नसून तो सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा असतो. आमचे नेते या मेळाव्यात कार्यकर्त्यांना भविष्याची दिशा दाखवतील. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत खात्री देता येणार नाही. मात्र, आम्ही त्यांना आमंत्रण देऊ शकतो, आणि तेही आम्हाला आमंत्रित करू शकतात,” असेही ते म्हणाले होते.
Vidarbha Farmers : चार फूट खोल पाण्यातून रोज शेतात जातात शेतकरी!
सचिन अहिर यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता रंगत असताना, संजय राऊतांनी मात्र यावर फुलस्टॉप लावला आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात संवाद सुरू असला तरी दसरा मेळाव्याच्या मंचावर ते एकत्र येतील, अशी शक्यता दूरच आहे, हे राऊतांच्या विधानातून स्पष्ट झाले आहे.
___