Aapli Bus Drivers Begin Indefinite Strike from Today : ७० बसेस थांबल्या, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार
Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागांतर्गत अंतर्गत असलेली आपली बस (खापरी डेपो) येथील बस चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (४ सप्टेबर) संप पुकारला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार चालकांनी व्यक्त केला आहे. आज शहरातील ७० बसेसची चाके थांबली असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, कामगार सेलचे नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष विवेक वानखेडे, राकेश घोसेकर (सल्लागार) यांच्या शिष्टमंडळाने आज महानगरपालिका सहआयुक्त भगत व इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून चालकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले आणि मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या संदर्भात, नागपूर महानगरपालिका पत्र जा. क्र. / २९३/२०२५ आणि परिवहन विभाग पत्र दिनांक ०९.०७.२०२१ चा संदर्भ देत चालकांनी म्हटले आहे की, माननीय कामगार आयुक्त आणि महानगर पालिकेमधील अधिकाऱ्यांसमोर झालेल्या चर्चेनुसार पंधरा दिवसांच्या आत वेतन देण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु, तरीही प्रशासनाकडून २०२४ च्या अधिसूचनेनुसार पगार देण्यात आलेला नाही.
Election Commission of India : सहा वर्षांत उमेदवार उभा केला नाही, या पक्षाची मान्यता होणार रद्द?
मेंटेनन्स स्टाफ यांना वेतन कायदा २०२४ नुसार एरियस आणि पगार लागू करण्यात यावा. २०१७ ते २०२२ आणि २०२४ ते २०२५ या कालावधीची पी. एल. (प्रिव्हिलेज लीव्ह) ची रक्कम चालकांना तात्काळ देण्यात यावी. ज्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी थांबवून ठेवलेली आहे, त्यांना शासनाच्या नियमानुसार सात दिवसांच्या आत ग्रॅच्युइटी देण्यात यावी. शासनाच्या नियमानुसार सन २०१७ पासून पी. एफ. (प्रोव्हिडंट फंड) ची रक्कम पी. एफ. खात्यात जमा केलेली नाही, जो की कायद्यानुसार गुन्हा आहे. ही रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी. नागपूरमधून इतर राज्यांमध्ये ट्रान्सफर केलेल्या मेंटेनन्स स्टाफच्या बदल्या तात्काळ थांबविण्यात याव्यात. दर महिन्याच्या १ ते १० तारखेच्या आत सर्व कर्मचाऱ्यांचे नियमानुसार पगार करण्यात यावेत. या मागण्या करण्यात आल्या आहेत.
सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत, आजपासून बेमुदत काम बंद संप सुरूच राहील, असा निर्धार चालकांनी व्यक्त केला आहे. यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. अन्यथा पक्षाकडून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आंदोलनात कर्मचारी सतीश नायर, रुपेश पडोळे, चंद्रशेखर गजभिये, रुपेश निकोसे, सुरेंद्र मानकर, प्रकाश कोरमकर, सुमेध पाटील, फईम शेख, असलम खान, प्रणय गजापुरे, अशपाक शेख, समीर चातारकर, मनोज शुक्ला, भूपेंद्र शुक्ला, राजेश गाढवे, रमेश गजघाटे, सचिन वर्धे, राजेश मामुलकर, संजय कळसकर, चिंतेश्वर बहिंडवार, निलेश वैद्य, हिमांशू करकाडे, अशोक दक्ष, अश्विन बिचवे, मुन्ना शेख, उमेश वंजारी, मोहन कांबळे, निखिल जगनाथ सहभागी झाले आहेत.








