Focus on micro Planning in Shegaon Meeting : शेगावच्या बैठकीत सूक्ष्म नियोजनावर भर, स्वबळाची तयारी
Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना ‘घाटाखाली’ आपली ताकद वाढवू शकते का, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर शेगाव येथे अलीकडेच आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये कार्यकर्त्यांना सूक्ष्म नियोजनाचे आदेश नेत्यांनी दिले. त्याचवेळी स्वबळाची तयारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, शिंदेसेनेचे सहसंपर्कप्रमुख शांताराम दाणे, जिल्हाप्रमुख संतोष डिवरे, महिला नेत्या शारदा पाटील, चेतन पाटील, राजेश मिरगे, संतोष घाटोळ, तालुकाप्रमुख रामा थारकर, तसेच शेगाव शहरप्रमुख संतोष लिप्ते यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Local Body Elections : भाजपमध्ये ‘इनकमिंग’ वाढले, महायुतीला काय फायदा?
जाधव यांनी बैठकीत स्पष्ट संकेत दिले की, आगामी पालिका, परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांत भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती होण्याची शक्यता असली तरी काही कारणास्तव ती न झाल्यास स्वबळावर निवडणुकीस सज्ज राहा, अशी सूचना देण्यात आली.
सध्या घाटाखालील भागात शिंदेसेनेचा जनाधार तुलनेने कमी आहे. या भागात त्यांचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही, तर पंचायत समितीत केवळ चार सदस्य आहेत. नगरपालिकांमध्येही अवघे सहा नगरसेवक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिंदेसेना घाटाखाली जोर मारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.
जाधव म्हणाले, “केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अनेक जनकल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सरकारचे कामकाज जनतेसमोर मांडणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
या बैठकीनंतर शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, घाटाखाली पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.








