Strong words in the meeting, excitement in state politics : बैठकीत खडेबोल, राज्याच्या राजकारणात खळबळ!
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील काही मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. गुप्त बैठकीतच शिंदे यांनी अकार्यक्षम मंत्र्यांना खडेबोल सुनावत आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटना मजबूत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शिंदे यांनी कॅबिनेटनंतर बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. विशेषतः प्रशासनाकडे आणि पक्ष संघटनेकडे होणारे दुर्लक्ष, तसेच जनतेशी संवाद साधण्यात येणारी कमतरता यावर त्यांनी थेट टीका केली.
सत्तेत आल्यानंतर शिंदे यांनी मंत्र्यांना ‘जनता दरबार’ घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, ज्यायोगे थेट नागरिकांशी संवाद साधता येईल. सुरुवातीला काही मंत्र्यांनी याचे पालन केले, मात्र कालांतराने हा उपक्रम थंडावल्याचे दिसून आले. यावरून शिंदेंनी नाराजी व्यक्त करत, “जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून संधी दिली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये जा, जिल्ह्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा आणि संघटन बळकट करा,” अशा कठोर शब्दांत मंत्र्यांना सूचना केल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार, शिंदेंनी बैठकीत स्पष्ट केले की, अनेक मंत्री फक्त मुंबईतील कॅबिनेट बैठकांपुरतेच मर्यादित राहतात. पक्षवाढ, संघटनात्मक कामे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष होतेय. “पक्ष आहे म्हणून आपण आहोत. जर जनतेचे प्रश्न सोडवले जाणार नसतील, तर गंभीर विचार करावा लागेल,” असा गार्भित इशाराही शिंदेंनी दिल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदेंनी मंत्र्यांना विशेष जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. आगामी निवडणुकीत मंत्र्यांची अकार्यक्षमता पक्षाला फटका बसू शकते, याची जाणीव करून देत शिंदे आता ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचे सांगितले जात आहे.