Additional burden on the pockets of all types of consumers : सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार
Mumbai : ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरण कडून वीजदरवाढीचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा ‘शॉक’ बसला आहे. इंधन समायोजन शुल्काच्या स्वरूपात लादण्यात आलेल्या या दरवाढीमुळे ऑक्टोबर महिन्याच्या वीज बिलात प्रति युनिट ३५ पैशांपासून ते ९५ पैशांपर्यंत वाढ होणार आहे. ही दरवाढ सर्व प्रकारच्या ग्राहकांवर घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक लागू होणार असून, दिवाळीच्या खर्चात आणखी भर पडणार आहे.
महावितरणने १ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सप्टेंबर महिन्यात झालेल्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच, पुढील आदेशापर्यंत ही वाढ लागू राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वीज निर्मितीचा खर्च वाढल्याने आणि ओपन मार्केटमधून महाग वीज खरेदी करावी लागल्याने ही वाढ अनिवार्य झाल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
Toxic cough syrup : चिमुकल्यांना विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला बेड्या
महावितरणच्या मते, वीज मागणी वाढल्यामुळे अतिरिक्त उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला, ज्यामुळे ग्राहकांवर तात्पुरता आर्थिक भार टाकावा लागला आहे. संस्थेने पुढील काही वर्षांत दरांमध्ये स्थैर्य आणि संभाव्य घट होईल, असेही सूचित केले आहे. मात्र सध्या ग्राहकांना वाढीव दरानेच बिल भरावे लागणार आहे.
१ ते १०० युनिट वापरावर प्रति युनिट ३५ पैसे वाढ १०१ ते ३०० युनिट वापरावर प्रति युनिट ६५ पैसे वाढ. ३०१ ते ५०० युनिट वापरावर प्रति युनिट ८५ पैसे वाढ, ५०१ युनिटपेक्षा अधिक वापरावर प्रति युनिट ९५ पैसे वाढ अशी दरवाढ राहणार आहे.
या दरवाढीचा थेट फटका लाखो वीजग्राहकांना बसणार असून, महागाईच्या काळात आणि सणासुदीच्या दिवसांत हा निर्णय सर्वसामान्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महावितरणकडून ही दरवाढ तात्पुरती असल्याचा दावा करण्यात आला असला तरी, ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.