Deepak Kesarkars explanation on Rohit Arya case : रोहित आर्य प्रकरणावर दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
Mumbai : पवईतील आर. ए. स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य प्रकरणानं राज्यात खळबळ उडवली आहे. या घटनेत पोलिसांनी सर्व मुलांची सुखरूप सुटका केली, तर आरोपी रोहित आर्य पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. आर्यनं सरकारकडून थकीत असलेल्या दोन कोटी रुपयांच्या देण्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन हे कृत्य केल्याचा आरोप समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
केसरकर म्हणाले की, “शासनाकडे कुणाचंही बिल कायमस्वरूपी अडकलं राहत नाही. पण रोहित आर्य यांच्या प्रकरणात विभागानं असा मुद्दा मांडला होता की त्यांनी ‘स्वच्छता मॉनिटर’ या योजनेअंतर्गत एक वेबसाईट ॲक्टिव्ह केली आणि त्यासाठी काही विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले. त्यामुळे विभागाने सांगितले की त्यांनी ते पैसे परत करावेत आणि अशा प्रकारचं पुन्हा घडणार नाही, याची लेखी हमी द्यावी. जर त्यांनी ही पूर्तता केली असती, तर त्यांचे बिल देण्यात कोणतीच अडचण आली नसती. पण त्यांनी त्याऐवजी अत्यंत चुकीचा मार्ग अवलंबला.”
Prakash Ambedkar : वाहने फोडायची असतील तर सत्ताधाऱ्यांची फोडा, आंबेडकर बरसले
ते म्हणाले, “मुलांना ओलीस ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. असा पायंडा पडला, तर समाजात अराजकता निर्माण होईल. योग्य वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून मुलांची सुटका केली, ही समाधानाची बाब आहे. मात्र, रोहित आर्य यांचा अशा प्रकारे मृत्यू होणं वेदनादायक आहे. जर खरोखर त्यांच्या कुटुंबाचे पैसे शासनाकडे थकलेले असतील, तर मी स्वतः त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.”
केसरकर यांनी सांगितले की, “रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर ही योजना राबवत होते. त्यांनी सरकारी मोहिमेत सहभागी होऊन काही काम केलं, परंतु त्या प्रक्रियेत काही गैरसमज निर्माण झाले. विभागाने स्पष्ट केलं की ‘दोन कोटी रुपये’ हे केवळ एका व्यक्तीसाठी तरतूद केलेले नव्हते. ती रक्कम संपूर्ण प्रकल्प आणि स्वयंसेवकांच्या मोबदल्यासाठी होती. त्यामुळे हा त्यांचा गैरसमज होता. त्यावेळी त्यांनी आंदोलन केलं, तेव्हा मी अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यांनी नंतर आंदोलनही मागे घेतलं होतं.”
तसेच, केसरकर म्हणाले की, “मी त्या काळात शालेय शिक्षणमंत्री होतो, पण या घटनेच्या वेळी मी त्या विषयावर निर्णय घेण्याच्या पदावर नव्हतो. त्यामुळे त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असता, तरी काही होणं शक्य नव्हतं. मुलांना ओलीस ठेवणं अत्यंत संवेदनशील बाब होती. जर त्यांनी मुलांना इजा केली असती, तर परिस्थिती आणखी बिकट झाली असती. त्यामुळे पोलिसांनी त्वरित कारवाई करून योग्य पद्धतीनं ही परिस्थिती हाताळली.”
MNS office bearers’ gathering : निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा स्फोटक आरोप, म्हणाले…
ही संपूर्ण घटना पवईतील हाय-प्रोफाइल ‘महावीर क्लासिक’ इमारतीतील आर. ए. स्टुडिओत घडली. येथे गेल्या काही दिवसांपासून सिनेमा आणि वेब सीरीजसाठी कास्टिंग सुरू होतं. त्यासाठी 17 मुलांचं फायनल कास्टिंग झालं होतं. गुरुवारी दुपारी ही मुलं स्टुडिओमध्ये होती आणि पालक बाहेर वाट पाहत होते. मुलांनी खिडकीतून हात हलवत मदतीचा इशारा दिल्यानंतर पालक आणि पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी सर्व मुलांची सुखरूप सुटका केली, मात्र रोहित आर्य याने पोलिसांवर गोळीबार केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडून त्याला ठार केलं.
या घटनेनंतर रोहित आर्यच्या मानसिक नैराश्याचे आणि सरकारी थकबाकीच्या प्रकरणाचे तपशील समोर आल्यानं, राज्य शासनाच्या यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान, दीपक केसरकर यांनीही स्पष्ट केलं की, “अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून शासनानं वेळीच यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. शासनाचे नियम कठोर असले तरी, सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून अशा व्यक्तींना वेळेवर मदत मिळणं आवश्यक आहे.”
 
             
		
