Mumbai has become a tumbai, there should not be a flood in Nagpur : राज्य सरकार आणि महानगरपालिकेकडून सामान्य नागरिकांची अपेक्षा
Nagpur : मुसळधार पावसाने आज मुंबईसह उपनगरांमध्ये हाहाकार उडाला. रस्ते, रेल्वे ट्रॅक, बरीचशी रुग्णालये, मेट्रो रेल्वे स्टेशन्स पाण्याखाली आले. कामावर जाताना चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. ही संधी साधून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले. तर सत्ताधाऱ्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मुंबईची तर तुंबई झाली, पण नागपूरमध्ये यंदा पावसामुळे सन २०२२ सारखा महापूर होऊ नये, अशी अपेक्षा नागपूरकर व्यक्त करत आहेत.
मुंबईत आज झालेल्या मुसळधार पावसाचे चित्र टीव्हीवर बघितल्यानंतर नागपूरकरांना २३ सप्टेंबर २०२२ ची रात्र आठवली. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस इतका प्रचंड होता की संपूर्ण शहरच कवेत घेतो की काय, असे वाटू लागले होते. अंबाझरी तलावातून ओव्हर फ्लो इतका प्रचंड होता की, त्या रस्त्यावरील सिमेंट, डांबर, ब्लॉक्स सर्वकाही प्लास्टीकच्या कचऱ्याप्रमाणे आणि कागदांच्या होड्यांप्रमाणे धरमपेठ पॉलिटेक्निक कॉलेजच्या पुढे वाहून गेले.
स्विमींग पूल झाला होता उद्ध्वस्त..
तेथेच असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या जलतरण तलावांत रस्त्यांवरील ब्लॉक्स, झाडांच्या फांद्या आणि काडीकचरा वाहत आला. या महापुरात एनआयटीचा इनडोअर स्विमींग पूल थोडक्यात बचावला. पण खुल्यामध्ये असलेला मुख्य पूल आणि डायव्हींग पुलची पार ऐसीतैसी झाली होती. त्याच्या दुरूस्तीसाठी मग कित्येक महिने लागले होते. जलतरणपटुंची त्यामुळे मोठी गैरसोय झाली होती.
Seperate Vidarbha state : स्वतंत्र विदर्भासाठी पुन्हा एकदा हुंकार!
रस्त्यांवरून बोटी..
ज्या रस्त्यांवरून चारचाकी, दुचाकी वाहने धावतात, तेथे इतके पाणी साचले होते की, त्याच रस्त्यांवरून बोटी चालत होत्या. मोठ्या प्रमाणात बचाव कार्य तेव्हा करावे लागले होते. नाग नदीतून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे स्वप्न तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना दाखवले होते. नाग नदीतून तर नाही, पण रस्त्यांवर बोटी वल्हवताना तेव्हा नागपूरकरांनी बघितल्या. त्याचे व्हिडिओ गडकरींच्या भाषणासह सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. गडकरी आणि फडणवीसांचे हे शहर आहे आणि एका पावसामुळे शहरात महापूर आल्यामुळे या दोन्ही शिर्षस्थ नेत्यांवर नागपूरकरांनी चांगलाच रोष व्यक्त केला होता.
MLA Shweta Mahale : स्टार्टअप चळवळ ही भारताच्या आर्थिक सुवर्णयुगाची नांदी
अंबाझरी तलाव जैसे थे..
मुसळधार पाऊस झाल्यानंतर अंबाझरी तलावाच्या ओव्हर फ्लोमुळे नागपूरकरांचे हाल होऊ नयेत म्हणून उच्च स्तरावरून उपाययोजना करण्यात आल्या. (किंवा तसे भासवण्यात तरी आले) पण प्रत्यक्षात तलावाच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे दिसले नाही. आजही पाण्यावर प्रचंड प्रमाणात पसरलेली जलपर्णी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची साक्ष देते आहे. अंबाझरी तलाव ‘जैसे थे’च आहे.
जलदोस्त की जलदुश्मन ?
अंबाझरी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी पाण्यावर चालणारी एक मशीन आणण्यात आली होती. ही मशीन जलपर्णी काढण्याचे काम करत होती. त्याला ‘जलदोस्त’ असे नाव देण्यात आले होते. एक ऑपरेटर आणि दोन सहकारी जलदोस्तच्या माध्यमातून काम करत होते. पण जलपर्णी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली होती की एका बाजुची वनस्पती काढल्यानंतर दुसऱ्या बाजुची वनस्पती काढून परत येईपर्यंत पहिल्या बाजुला तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त जलपर्णी जमा होत होती. त्यामुळे जलदोस्त निकामी ठरला होता. हा ‘जलदोस्त’ आहे की ‘जलदुश्मन’, असे तेथे मॉर्निंग वॉकला येणार लोक चेष्ठेने बोलत होते.