Harshvardhan Sapkal : शेतकऱ्यांसाठी दिल्लीत गेले, सुरजागडवर चर्चा करून परतले

government is only making announcements while farmers are in crisis : काँग्रेसाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Buldhana राज्यातील शेतकरी सततच्या अस्मानी-सुलतानी संकटात सापडलेले असताना सत्ताधारी भाजप-युती सरकार मात्र केवळ घोषणाबाजी करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. “मुख्यमंत्री दिल्ली दौर्‍यावर गेले, पण पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडून पॅकेज मिळवण्याऐवजी सुरजागड लोखंड खाणीसाठी चर्चा केली. हे संतापजनक असून मुख्यमंत्री जर शेतकऱ्यांसाठी पॅकेज न घेता परतले, तर तेथेच थांबावं,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

२६ सप्टेंबर रोजी सपकाळ यांनी मोताळा तालुक्यातील कामखेड, गुळभेली, राहेरा दाभोळ तांडा, नळकुंड तसेच बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट, पाडळी येथे जाऊन अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे आणि आमदार धीरज लिंगाडे उपस्थित होते.

Ravindra Chavhan : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वाहनावर सोयाबीन फेकण्याचा प्रयत्न

प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले, “ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये, खरडून गेलेल्या जमिनीसाठी एकरी २ लाख रुपये मदत द्यावी. रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावीत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. पण सरकारने घोषित केलेली मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या पदरात हेक्टरी ३ हजारही पडणार नाहीत.”

काँग्रेसने ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. “काँग्रेस सरकारने नेहमीच शेतकऱ्यांना मदत केली, मग आत्ताच्या सरकारला काय अडचण आहे?” असा सवाल करत सपकाळ यांनी अर्थमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधला. “अदानींच्या फाईलवर सही करताना आणि ८८ हजार कोटींच्या महामार्गाला मंजुरी देताना त्यांना अडचण आली नाही. मात्र शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसा कुठून आणायचा, असा सवाल करून ते लाजिरवाणे वागतात,” अशी टीका त्यांनी केली.

Heavy Rain : १ लाख शेतकरी वंचित, फक्त ११ हजार शेतकऱ्यांना मदत!

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम वादग्रस्त वक्तव्य पुढे करून शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांवरून लक्ष विचलीत करतात, असा आरोप सपकाळ यांनी केला. “भिडे यांचे वक्तव्य हे सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लक्ष वळवण्याचा डाव आहे. भिडेंनी दांडिया खेळणाऱ्या हिंदूंनाच हांडगे म्हटले का?” असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय कल्याणमध्ये दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपच्या गुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करून केलेल्या अत्याचाराचा संदर्भ देत सपकाळ म्हणाले, “हे गुंड भाजप प्रदेशाध्यक्षांच्या गावातीलच आहेत. हीच भाजपची संस्कृती आहे. काँग्रेस पक्ष त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी असून त्यांचा लवकरच गौरव करण्यात येईल.”