Roads closed for sand transport, Sudhir Mungantiwar seeks extension : सततच्या पावसाने रेतीचा उपसाही थांबला
Chandrapur : घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने ८ एप्रिल २०२५ रोजी घेतला होता. या मोफत रेती पुरवठ्याची अंतिम मुदत १० जून २०२५ ठरवण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. या पावसाने रेतीचा उपसा थांबला आहे आणि रेती वाहतुकीचे रस्तेही बंद झाले आहेत. त्यामुळे १० जूनपर्यंत असलेली मुदत ३० जूनपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
आमदार मुनगंटीवार यांनी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्र सुरू होते. त्यानंतर साधारणतः एक ते दोन आठवड्यात पावसाला सुरूवात होते. पण यंदा मे महिन्यातच पावसाने धुमाकुळ घातला. नवतपाचा प्रभावही या पावसाने संपवला. अशा परिस्थितीत नद्या व नाल्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रेतीचा उपसा बंद झाला आणि वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत.
रेती नसल्यामुळे अनेक घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे योजनेची मुदत वाढवावी, असा आग्रह आमदार मुनगंटीवार यांनी धरला आहे. महसूल व वनविभागाचे प्रधान सचिव यांनाही आमदार मुनगंटीवार यांनी यासंदर्भात पत्र दिले आहे. ३० जूनपर्यंत मुदत वाढवल्याने लाभार्थ्यांना अपूर्ण राहिलेले बांधकाम पूर्ण करता येईल. त्यामुळे शासनाने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.