FIR against 13 people on fake birth certificate : भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, १६ जणांची यादी सादर
Akola बांगलादेशी नागरिक घुसखोरीच्या मुद्द्यावर भाजप नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya यांनी गुरुवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यात १६ जणांची यादी पुराव्यासह सादर केली. जिल्ह्यात विविध भागांत वास्तव्य करणाऱ्या ८० जणांनी गैरमार्गाने जन्म दाखला मिळवून भारताचे नागरिकत्व मिळवल्याचा दावा सोमय्या यांनी केला.
याप्रकरणी त्यांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच तिघांना अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात उशिरा दाखल झालेल्या जन्म व जात प्रमाणपत्र अर्जांविषयी सोमय्या यांनी आक्षेप घेतला. त्यांनी संबंधित नावे बांगलादेशी नागरिकांची असल्याचा आरोप केला.
सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने रामदासपेठ पोलीस ठाण्यात हजर राहून त्यांनी १६ जणांची यादी शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी व निरीक्षक मनोज बहुरे यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच लवकरच फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याचा अधिकार पोलिसांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अकोला तहसीलच्या नायब तहसीलदार स्वप्नाली काळे यांनी जन्मतारखेत फेरफार करून बनावट प्रमाणपत्र मिळवणाऱ्या १२ जणांविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी बीएनएस कलम ३१८(४), ३३६(२), ३३७, ३३६(३), ३४०(२), ३(५) अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत. पोलिसांनी मेहबूब खान नाजुल्ला खान, मोहम्मद जुबेर मोहम्मद युनूस आणि अब्दुल जुनेद पटेल अब्दुल बहार पटेल या तिघांना अटक केली. १३ व्या आरोपीचे नाव तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती आहे.
या प्रकरणात तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शाळेतील नोंदींची तपासणी सुरू आहे. तहसीलदारांच्या संमतीशिवाय बनावट दाखले तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे दोषींना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य कारवाई न केल्यास त्यांनाही जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.