Kacheguda-Bhagat Ki Kothi Express to run from 20th July : १७ वर्षांनी प्रवाशांचे स्वप्न साकार; अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर पहिली दैनंदिन गाडी
Akola अकोला-पूर्णा या बहुप्रतीक्षित ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पहिली दैनंदिन लांब पल्ल्याची एक्स्प्रेस गाडी धावणार आहे. १७६०५/०६ काचीगुडा-भगत की कोठी एक्स्प्रेस ही गाडी आज, रविवार, दि. २० जुलै २०२५ पासून या मार्गावर सुरू होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे.
खासदार अनुप धोत्रे यांनी यासंदर्भात मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला. माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि माजी खासदार भावना गवळी यांनी या मार्गाचे उद्घाटन केले होते. आता प्रत्यक्ष दैनंदिन सेवा सुरू होत आहे.
Governor of Maharashtra : ‘सप्रेम भेट योजना’ सुरू करा; विवाहवंचित तरुणांसाठी राज्यपालांना साकडे
ब्रॉडगेजची वाटचाल : २००८ पासूनची प्रतीक्षा
२००८ मध्ये मीटर गेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होऊन अकोला-पूर्णा मार्गाचे उद्घाटन झाले होते. प्रारंभी तीन पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या. परंतु लांब पल्ल्याची दैनंदिन गाडी सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. २०११ मध्ये काचीगुडा-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस अकोलापर्यंत वाढवण्यात आली आणि नंतर ती नरखेडपर्यंत धावू लागली. मात्र, ती फक्त विस्तारित सेवा होती; नवीन गाडी नव्हती.
मीनाक्षी एक्स्प्रेसची आठवण
पूर्वी मीटर गेज मार्गावर धावणारी हैदराबाद-जयपूर मीनाक्षी एक्स्प्रेस ही लांब पल्ल्याची गाडी २००६ मध्ये बंद झाली होती. त्यामुळे १९ वर्षांनी या मार्गावर पहिल्यांदाच दैनंदिन ब्रॉडगेज एक्स्प्रेस धावणार आहे. ही गाडी मीनाक्षी एक्स्प्रेसच्या आठवणींना उजाळा देणारी ठरत आहे.
ही गाडी मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांना जोडणार आहे. यात महाकाल, मल्लिकार्जुन, ओंकारेश्वर, श्याम खाटू, सालासर बालाजी, बाबा रामदेव, अजमेर दर्गा, पुष्कर, ओसिया, राणी सती, नाकोडा तीर्थ, जेसलमेर अशा धार्मिक स्थळांवर जाणाऱ्या भाविकांसाठी ही एक महत्त्वाची सोय ठरणार आहे.