Uday Samant said, if action is needed, we should also look at Navi Mumbai : उदय सामंत म्हणाले, कारवाई हवी असेल तर नवी मुंबईकडेही पाहावे
Mumbai : पुण्याच्या जैन बोर्डिंग प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत संबंधित जमिनीच्या व्यवहाराचा मुद्दा उचलून धरला आहे. या प्रकरणातील व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली असून, धंगेकर यांनी या प्रकरणात दररोज आरोपांचे बॉम्ब फोडत “कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही” अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी धंगेकर यांच्या भूमिकेवर आणि सरकारच्या संभाव्य प्रतिक्रियेवर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी सांगितले, “रवींद्र धंगेकर यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे, त्यांना भेटायला जाणार आहे. त्यांनी संयम बाळगावा, तसेच इतर नेत्यांनीही तोच संयम ठेवावा.”
Local Body Election : मतदारांच्या नव्हे, तर नेत्यांच्या मनात आहे जात !
सामंत पुढे म्हणाले, “जर धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडलं हेही पाहावं लागेल. कोणी सुरुवात केली हे सगळ्यांना ठाऊक आहे.” त्यांच्या या वक्तव्याला वनमंत्री गणेश नाईकांवर अप्रत्यक्ष प्रहार म्हणून पाहिले जात आहे. या विधानामुळे “सरकार धंगेकरांविरोधात कारवाई करणार का?” या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न झाला असल्याचीही चर्चा सुरू आहे.
पत्रकार परिषदेत सामंत यांनी महालुतीतील ऐक्य आणि युतीच्या निर्णय प्रक्रियेबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “माझ्या वक्तव्याचा गैरसमज झाला आहे. आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार आहोत. एकनाथ शिंदे यांनीही तीच भूमिका घेतली आहे. तीनही पक्षांच्या नेत्यांना त्रास होणार नाही, पण स्थानिक पातळीवर कुणी जास्त ‘खुमखुमी’ दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू.”
Congress protest : सरकारने केली शेतकरी आणि बेरोजगारांची घोर फसवणूक
सामंत यांनी पुढे सांगितले, “महायुतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला असेल त्यानुसारच निर्णय होतील. युतीचे निर्णय घेण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. मात्र, महायुतीत मिठाचा खडा टाकणाऱ्यांना बाजूला केले पाहिजे.”
बालनाट्य परिषदेवरील आरोपांबाबत सामंत म्हणाले, “हा पूर्णपणे बालनाट्य परिषदेचा विषय आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच आता खुलासा केला आहे.”
दरम्यान, संजय राऊत यांच्या ‘राहुल गांधी पंतप्रधान होतील’ या वक्तव्यावर सामंतांनी टोला लगावला. “राहुल गांधी पंतप्रधान होणार हे दिवास्वप्न आहे. राहुल गांधी पंतप्रधान होतील असं म्हणणं म्हणजे मी ट्रम्प झालो, असंच आहे,” असे ते म्हणाले.
एमसीए निवडणुकीबाबत विचारले असता सामंत हसत म्हणाले, “मी क्रिकेट खेळलो आहे, आता कबड्डीही खेळायची आहे तसं अजित पवारांना सांगावं लागेल. शरद पवार यांचं योगदान मात्र मोठं आहे.”
जैन बोर्डिंग प्रकरण, महायुतीतील ऐक्य आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांचे हे विधान राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात असून, या घडामोडींमुळे पुणे आणि राज्यातील राजकारणाला पुन्हा वेग आला आहे.
______