Local Body Elections : सिंदखेड राजा नगरपरिषद मतदारयादीत गोंधळाचा भडका!

Errors in Voter List Leave Prospective Candidates Confused : तब्बल ९०० हरकती प्राप्त, १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, इच्छुकांमध्ये संभ्रम

Sindkhed raja आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार यादीने शहरात राजकीय खळबळ उडवली आहे. या यादीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या चुकांमुळे मतदार आणि इच्छुक उमेदवार दोघांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडे आतापर्यंत तब्बल ९०० हरकती दाखल झाल्या असून, त्यानंतर प्रशासनाने हरकती दाखल करण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरपरिषदेच्या १० प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. काही मतदारांची नावे यादीतून गायब, तर काहींची नावे चुकीच्या प्रभागात नोंद झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या गोंधळामुळे अनेक मतदारांना आपले नाव शोधण्यात अडचणी येत आहेत, तर भावी उमेदवारांमध्येही धाकधूक वाढली आहे.

Swabhimani Shetkari Sanghatna : तर गाठ आमच्याशी आहे, ‘स्वाभिमानी’चा सरकारला इशारा

या परिस्थितीची दखल घेत प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष बोबडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “प्रत्येक मतदाराने आपले नाव आणि प्रभाग तपासून आवश्यक असल्यास हरकत दाखल करावी.” प्रशासनाने दिलेल्या मुदतवाढीमुळे नागरिकांना आपली नावे दुरुस्त करण्यासाठी आणखी काही दिवसांची संधी मिळाली आहे.

दरम्यान, मतदारयादीतील गोंधळावरून शहरात राजकीय चर्चा रंगू लागली आहे. काही पक्ष आणि संभाव्य उमेदवार प्रशासनावर अकार्यक्षमतेचा आरोप करत असून, येत्या निवडणुकीपूर्वी मतदारयादीतील या त्रुटी दुरुस्त न झाल्यास मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Banana-Growing Farmers’ Protest : अंजनगाव बोर्डाला बुरहानपूरचा भाव द्या, शेतकऱ्यांचे आंदोलन

आता या ९०० हरकतींवर नगरपरिषद प्रशासन कोणती कार्यवाही करते, आणि अंतिम मतदारयादीत किती सुधारणा होतात, याकडे सिंदखेड राजातील सर्व पक्ष, उमेदवार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.