Possibility of new political equations through Third Front : जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी पर्यायी नेतृत्वाची आवश्यकता असल्याचं मत
Akola सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिल्याने अकोला महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. जकरिया फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी अकोला शहराच्या विकासासाठी सक्षम, पारदर्शक आणि जनहितवादी ‘थर्ड फ्रंट’ची गरज असल्याचे स्पष्ट करीत चाचपणी सुरू केली आहे.
“शहराच्या संतुलित विकासासाठी आणि सामान्य जनतेच्या खऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पर्यायी नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अल्प मतांनी विजयी झाले, मात्र महापालिकेच्या पातळीवर काँग्रेसची ताकद पुरेशी नाही. त्यामुळे भाजपला प्रभावी पर्याय ठरू शकेल असा एकत्रित आणि सक्षम थर्ड फ्रंटच गरजेचा आहे.”
Uday Samant : टेक्सटाईल उद्योजकांसाठी खुशखबर; एक वर्षासाठी जमिनीचे दर कमी
गेल्या अनेक वर्षांपासून अकोला महापालिकेवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. मात्र सध्या जनतेत त्यांच्या कारभाराविषयी नाराजी आहे. तरीही विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने भाजप पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते, सुशिक्षित तरुण आणि जबाबदार नागरिकांनी पुढे येत एक प्रभावी ‘थर्ड फ्रंट’ तयार करावा, अशी अपेक्षा जकरिया यांनी व्यक्त केली.
“हा थर्ड फ्रंट कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून, अकोला शहराच्या दीर्घकालीन आणि सर्वांगीण विकासासाठी असेल. शहरासाठी काहीतरी करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आता राजकारणाच्या चौकटीबाहेर येऊन विकासासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वर्गीय विनय कुमार पाराशर यांचा उल्लेख करताना ते म्हणाले, “त्यांच्या कार्यकाळात शहराला नवी ओळख मिळाली होती. मात्र त्यानंतरच्या नगर परिषद व महापालिकेतील राजकारणामुळे अकोला विकासाच्या शर्यतीत मागे राहिला. ही परिस्थिती बदलण्यासाठी थर्ड फ्रंटच प्रभावी ठरू शकतो.”
शेवटी, जकरिया यांनी शहरातील सुजाण नागरिकांना आवाहन केले की, “जे नागरिक आपल्या शहरावर प्रेम करतात, त्यांनी पुढे येऊन या परिवर्तनासाठी सक्रिय भूमिका घ्यावी. कारण एक सक्षम थर्ड फ्रंटच अकोल्याला नवी दिशा आणि नवा वेग देऊ शकतो.”