Mahavitaran : दिवाळीतच डिग्रस गावठाण अंधारात, नागरिकांचा संताप

Citizens Outraged as Power cut in Diwali : कनिष्ठ अभियंता पद रिक्त, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Buldhana दिवाळीसारख्या प्रकाशाच्या सणात डिग्रस गावठाण मात्र अंधाराच्या सावटाखाली आहे. भल्या पहाटे कृषी पंप फिडर ओव्हरलोड होत असल्याने गावठाणात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे समोर आले आहे. येथील कनिष्ठ अभियंता पद दीर्घकाळापासून रिक्त असून, त्यामुळे महावितरणच्या दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत. वीज ग्राहकांची कामे रखडली असून तक्रारींचा ढिग वाढत आहे.

ग्रामस्थांनी डिग्रस फिडरच्या सततच्या वीजपुरवठा समस्येबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनही पाठविले, मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. ऊर्जा विभागाकडे प्रकरण वर्ग केल्याचे सांगण्यात आले असले तरी महावितरण गावठाण आणि कृषी फिडरला स्थिर वीजपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे.

Illegal Sand Mining : रात्री वाळूचे ढिगारे, सकाळी विल्हेवाट!

दरम्यान, महावितरणकडून आयोजित करण्यात येणारे ‘जनता दरबार’ आणि वीज आढावा बैठका कागदोपत्रीच मर्यादित राहत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. “जर जनता दरबार होत असतील, तर समस्यांचे निराकरण का होत नाही? जनजागृती कुठे आहे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. डिग्रस परिसरातील नागरिकांचा एकच सूर — “दिवाळीत प्रकाश हवा, अंधार नव्हे; वीज पुरवठा सुरळीत करावा आणि रिक्त पदे तातडीने भरावीत.”