Farmers are not interested in Crop Competition : जिल्ह्यात केवळ २५२ शेतकऱ्यांची नोंदणी
Wardha वाढते तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांतील जिज्ञासू वृत्ती वृद्धिंगत व्हावी, याकरिता शासनाकडून पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होत विजयी ठरणाऱ्या शेतकऱ्यांना पारितोषिकही देण्यात येते. मात्र, शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामाशी निगडित असलेल्या या स्पर्धेची जनजागृतीच झाली नाही. त्यामुळे ही योजनाच बारगळल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.
रब्बी हंगामात केवळ २५२ शेतकऱ्यांनीच पीक स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. सेलू तालुक्यात दोन आकडी संख्येचा आकडाही ओलांडता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून स्पर्धेला खो दिल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात साधारणतः गहू आणि चणा या पिकांचा समावेश आहे. यात आदिवासी आणि सर्वसाधारण अशा दोन गटांत स्पर्धेसाठी नोंदणी करायची होती. ही स्पर्धा कृषी विभागाच्या अखत्यारीत घेतली जाते. विशेष म्हणजे, यात सहभागासाठी कोणत्याही पद्धतीचे शुल्क नाही. यामुळे या स्पर्धेत शेतकऱ्यांचा सहभाग अधिकाधिक असणे अपेक्षित होते.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना प्रेक्षक ओरडत होते?
मात्र तरीही निव्वळ कृषी विभागाचा हलगर्जीपणा आणि वेळकाढू धोरणामुळे ही स्पर्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे दिसून येत आहे. राज्य आणि विभाग स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते वगळून, संबंधित जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील स्पर्धकांमधून जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येणार आहेत.
राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते वगळून, संबंधित तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील स्पर्धकांमधून तालुकास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येणार आहेत.
पीक स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जिल्ह्यातील आदिवासीबहुल शेतकरी आघाडीवर असायचा. मात्र, अलीकडे स्पर्धेत अत्यल्प सहभाग दिसून येतो आहे. गतवर्षी हा आकडा १९ एवढा होता. तर सर्वसाधारण गटामध्ये ६५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. यंदा आठ तालुक्यांतून ७८ आदिवासी बांधवांनी, तर सर्वसाधारण शेतकऱ्यांचा आकडा १७४ वर पोहोचला आहे.
CM Devendra Fadnavis : आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण
सेलू तालुक्यात सुपीक जमीन पाण्याची उपलब्धता तसेच विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र, स्पर्धा जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना असताना जनजागृतीअभावी सेलू तालुक्यातील केवळ ६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यात आदिवासी एकही शेतकरी नसल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कृषी विभाग कमी पडल्याचे दिसून येत आहे.