Protesters behavior disrupts social health : आंदोलकांच्या वागणुकीमुळे सामाजिक स्वास्थ्यास बाधा
Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेलं आंदोलन आता अधिकच तीव्र झालं आहे. गेल्या पाच दिवसांपासून जरांगे उपोषणावर असून, त्यांनी पाणीत्यागही केला आहे. त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आझाद मैदान आणि परिसरात प्रचंड गर्दी झाली असून वाहतूक कोंडी व जनजीवनावर मोठा परिणाम दिसून येत आहे.
काल मुंबई हायकोर्टाने आंदोलनावर सुनावणी घेत आंदोलकांना दक्षिण मुंबईत पसरू न देण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर आज मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांच्या कोअर टीमला नोटीस बजावत नियमांचे उल्लंघन झाल्याचं स्पष्ट केलं आहे. या नोटिशीत आंदोलकांनी ठरलेल्या अटी मोडल्या, अतिरिक्त लोक आणले, रस्त्यावर गाड्या पार्क केल्या, ठिकठिकाणी अन्न शिजवलं, अंघोळ केली आणि असभ्य वर्तन केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आंदोलकांच्या वागणुकीमुळे सामाजिक स्वास्थ्यास बाधा पोहोचल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे.
हायकोर्टाने 5 हजार लोकांसह आंदोलनाला परवानगी दिली होती, पण त्याचं उल्लंघन झाल्यामुळे पोलिसांनी नवीन परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, आंदोलनाचा मुद्दा तापला असतानाच आज मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाधिवक्ता यांच्या उपस्थितीत नवा जीआर काढण्याबाबत चर्चा होईल अशी माहिती समोर आली आहे. न्यायालयाच्या सूचनांवर सरकार काय भूमिका घेते याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Vikas Thakre : कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा !
आझाद मैदानावरचा संघर्ष तीव्र होत असून, पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलनाचं भवितव्य काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.