Malkapur depot gets new buses : आमदार संचेतींचा माजी आमदारांवर निशाणा; मलकापूर आगाराला मिळाल्या नवीन बस
बुलढाणा : मलकापूर बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे काम प्रगतीपथावर असून, मलकापूर आगाराला नव्या बसगाड्याही उपलब्ध झाल्या आहेत, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार चैनसुख संचेती यांनी केले. २०१४ पासून आगाराला नवीन बसगाड्या मिळाल्या नव्हत्या, याकडे लक्ष वेधत त्यांनी माजी आमदारांच्या कार्यकाळावर टीका केली.
आमदार संचेती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन बसगाड्यांची मागणी केली होती. त्यानंतर परिवहन मंत्र्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मलकापूर आगारासाठी पाच नवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या.
या बसगाड्यांचे लोकार्पण आमदार संचेती यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी बसच्या सुधारित सुविधा, उत्कृष्ट पुशबॅक सीट आणि इतर अत्याधुनिक सुविधांची माहिती घेतली तसेच बसच्या बनावट आणि रंगसंगतीचे कौतुक केले.
आगार कार्यशाळेचे नूतनीकरण करण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आगामी काळात आणखी २०० नवीन बसगाड्या मंजूर झाल्याचा दावा करत, त्या लवकरच आगारात दाखल होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी बाजार समितीचे सभापती संजय काजळे, भाजपा नेते यश संचेती, मोहन शर्मा, शंकरराव पाटील, माजी नगरसेवक अमृत बोंबटकार, अश्विनी साठे, आगार व्यवस्थापक मुकुंद न्हावकर, बसस्थानक प्रमुख समीर देशमुख, कार्यशाळा प्रमुख ज्ञानदेव चोपडे यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Vidarbha Farmers : शासनाची सोयाबीन खरेदी व्यापाऱ्यांसाठी आहे का?
“जनतेच्या सेवेकरिता उत्कृष्ट बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल एसटी महामंडळाचे अभिनंदन,” असे समाधान व्यक्त करत आमदार संचेती यांनी भविष्यातही बससेवेच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.