Case registered for flaunting sword during wedding : लग्नाच्या वरातीत केलेला डान्स सिद्धार्थ खरात यांच्या अंगलट
Buldhana मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर आखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका लग्नाच्या वरातीत त्यांनी तलवार हातात घेऊन नृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, १४ मे रोजी रात्री उशिरा अमडापूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
सदर प्रकार शस्त्र कायद्याच्या (Arms Act) अधीन गुन्हा ठरणार असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. या प्रकरणात आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह, त्यांच्या हाती तलवार दिल्याचा आरोप असलेल्या अनिल यादवराव मोरे (रा. उकळी सुकळी) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
MLA Pravin Tayade : आमदारांनी गायले गाणे… ‘आज मौसम बड़ा बेईमान है’!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका लग्न मिरवणुकीत आमदार खरात तलवार हातात घेऊन नाचताना आढळले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून तत्काळ स्वतःहून दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास अमडापूर पोलीस करीत आहे. आमदार खरात यांनी हाताळलेली तलवार जप्त करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सिद्धार्थ खरात हे पूर्वी प्रशासकीय सेवेत होते. त्यामुळे त्यांना कायदेशीर बाबींचे भान असणे अपेक्षित आहे. सध्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत असताना सार्वजनिक ठिकाणी तलवार हातात घेऊन नाचणे, हा समाजात चुकीचा संदेश देणारा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रात यापूर्वीही लग्नाच्या वरातीत तलवार घेऊन नाचल्याप्रकरणी काही जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त तलवार वापरून केक कापल्याच्या प्रकरणात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.