End Reservation Mess to Ensure Opportunities for Meritorious Students : आज मराठा मागत आहेत, उद्या ब्राह्मणही मागतील
Nagpur : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्र प्रभावीत झालेला आहे. खरं पाहिलं तर आरक्षण हा विषय संपला तर सर्वांसाठीच चांगलं होईल. कारण आज मराठा समाज आरक्षण मागत आहे, उद्या ब्राह्मणही आरक्षणाची मागणी करतील. मुळात आरक्षण १० वर्षांसाठी लागू झालं होतं. पण राजकीय पुढाऱ्यांमुळे ते आजतागायत कायम राहिलं. आरक्षण सरसकट रद्द झालं, तर हुशार विद्यार्थ्यांना संधी मिळेल, मग तो कोणत्याही समाजाचा असो. त्यामुळे आरक्षणाची भानगड संपली पाहिजे, असे नागपूरचे मुधाजो राजे भोसले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मुधोजी राजे म्हणाले, आंदोलनासाठी मोठ्या संख्येने लोक मुंबईत गोळा झाले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, तेथील लोकांना त्रास होणे स्वाभाविक आहे. आंदोलनावर लवकर तोडगा काढणे गरजेचे असते. मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकाऊ असलं पाहिजे. दुसऱ्या कुणाकडून आरक्षण काढून मराठ्यांना देणं योग्य होणार नाही. त्यामुळे मराठा समाजासाठी विशेष प्रवर्ग निर्माण करून आरक्षण दिलं गेलं पाहिजे.
Maratha Agitation : जरांगे पलटले, म्हणे.. आता ज्यांची गॅझेटमध्ये नोंद आहे, त्यांना आरक्षण द्या !
आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं पाहिजे. आंदोलनामध्ये समाजाची एकी कायम राहिली पाहिजे. ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देणे आजघडीला तरी शक्य नाही. आंदोलन पुढे जाताना काही ठिकाणी अंतर पडत जाते. ज्यांच्याकडे कुणबी मराठा म्हणून दस्तावेज आहेत, त्यांना सरकार ओबीसीमध्ये घेण्यास तयार आहे. त्यांना ओबीसीमध्ये घेतलेच पाहिजे. मात्र ज्यांच्याकडे असे दस्तावेज नाहीत, त्यांना ओबीसीमध्ये घेणे शक्य नाही. त्यामुळे मराठ्यांना वेगळं स्वतंत्र आरक्षण देणंच योग्य राहिल, असेही मुधोजी राजे भोसले यांनी सांगितले.