Building dispute sparks row between writers family and BJP : मूर्तिजापूर येथील शाळेच्या इमारतीवरून वाद, कारवाईला विरोध
Akola मूर्तिजापूर येथील शाळेच्या इमारतीवरून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांचे कुटुंब आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस विचारसरणीचे असल्याने प्रशासनावर दबाव टाकून कारवाईस भाग पाडले जात असल्याचा आरोप तिडके यांचे पुत्र सार्थ तिडके यांनी केला.
या आरोपांना भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. इमारत नियमानुसारच असल्याचे कागदपत्रे दिल्यास कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिले. मूर्तिजापूर नगरपालिकेच्या हद्दीत दोन इमारती उभारण्यात आल्या आहेत. एक व्यावसायिक कॉम्प्लेक्स आणि दुसरी परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या संस्थेच्या शाळेसाठी वापरण्यात येणारी इमारत.
प्रस्तावित डीपी रस्त्यावर हा इमारत भाग येत आहे. त्यामुळे परवानगीशिवाय बांधकाम झाल्याचे नगरपालिकेचे म्हणणे आहे. या प्रकरणी नगरपालिकेने डॉ. श्रीकांत तिडके यांच्या नावाने नोटीस बजावली. मात्र ही जमीन त्यांच्या पत्नीच्या नावावर असल्याने कारवाई नियमबाह्य असल्याचा तिडके कुटुंबाचा आक्षेप आहे.
शुक्रवारी नगरपालिकेचे पथक बुलडोझरसह कारवाईसाठी पोहोचले. त्यावेळी तिडके कुटुंबाने याला तीव्र विरोध केला. “जमीन एन.ए. करून सर्व परवानग्या घेतल्या आहेत. आम्ही काँग्रेस विचारसरणीचे असल्याने निवडणुकीत प्रचार केल्याचा सूड म्हणून सत्ताधाऱ्यांकडून ही कारवाई केली जात आहे,” असा आरोप सार्थ तिडके यांनी केला. या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Akola MLA Sajid Khan Pathan : साजिद खान म्हणाले, ‘राजराजेश्वर मंदिराचा विकास करा’!
भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. “प्रस्तावित डीपी मार्गावरील इमारत नियमानुसार असल्याची कागदपत्रे दिल्यास, कारवाई थांबवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू. मात्र, इमारत अनधिकृत असल्यास प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.”