Breaking

Harshawardhan Sapkal : नेत्यांच्या घोडेबाजाराला आळा घालणार !

New Congress state president started work : नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा निर्धार; पक्षाची तोडफोड थांबविणार

Buldhana पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी पक्षातील तोडफोड थांबवणार आहे आणि घोडेबाजारीला आळा घालणार आहे, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चिखली येथे व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर सपकाळ पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. हर्षवर्धन सपकाळ यांचे चिखलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘माझ्याकडे कोणताही राजकीय वारसा नाही. मात्र, पक्षनिष्ठा आणि कष्टाच्या जोरावर पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,’ असं ते म्हणाले.

महाराष्ट्रातील सर्वधर्मीय संस्कृती आणि सामाजिक ऐक्य जपणे, तसेच लोकशाही व भारतीय संविधानाचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आह, असंही ते म्हणाले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, शहराध्यक्ष अथरोद्दिन काझी, रिक्की काकडे, बाजार समितीचे सभापती डॉ. संतोष वानखेडे, दीपक देशमाने, डॉ. इसरार, सचिन बोंद्रे, जय बोंद्रे, तसेच नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सपकाळ यांचे ग्रामीण नाते..
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी सपकाळ त्यांची नाळ जुळली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचा राजकीय प्रवास देउळघाट सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरू झाला. त्यानंतर, त्यांच्या जिद्द आणि अथक परिश्रमामुळे ते जिल्हा परिषद अध्यक्षपदावर विराजमान झाले. या भूमिकेत त्यांनी जनसामान्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील विकासाला गती मिळाली. केवळ बुलढाणा नव्हे तर संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागात त्यांचं चांगलं नेटवर्क आहे.