Congress women MPs chant Jai Maharashtra, Dubey escapes : काँग्रेसच्या महिला खासदारांनी ‘ जय महाराष्ट्र’ म्हणतात दुबे पळाले…
New Delhi : ‘मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे’ असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना बुधवारी संसदेत मराठी खासदारांच्या रोषाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या महिला खासदारांनी त्यांना थेट लॉबीमध्ये घेरत जाब विचारला. यावेळी ‘जय महाराष्ट्र’च्या जोरदार घोषणा दिल्या गेल्या आणि गोंधळ निर्माण झाल्यानंतर दुबे यांना तिथून निघावं लागलं.
मराठी विरोधात केलेल्या विधानावरून दुबे यांच्यावर राज्यात आधीच टीका सुरू होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून त्यांनी बिहारमध्ये ये, पटक पटक के मारेंगे असं वक्तव्य केलं होतं. यामुळे मराठी जनतेमध्ये रोष निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी दुबे यांना संसदभवनाच्या लॉबीमध्ये थेट जाब विचारला.
मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? आपटून आपटून कुणाला मारणार? ही काय भाषा झाली? अशा शब्दांत गायकवाड यांनी दुबेंना सुनावलं. त्यांच्यासह इतर महिला खासदारांनीही त्यांच्या अर्वाच्य भाषेचा निषेध केला. लॉबीमध्ये हा सगळा प्रसंग सुरू असताना ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दिल्या गेल्या, ज्यामुळे परिसर दणाणून गेला.
या सर्व गदारोळात दुबे यांनी ‘ तुम तो मेरी बहन हो’ असं म्हणत आपली समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधक आक्रमक असल्यामुळे त्यांना तिथून निघून जावं लागलं. काही मराठी खासदार जे लॉबीजवळच होते, त्यांनीही यावर हास्य व्यक्त केल्याचं दृश्य दिसून आलं.
Amravati MIDC : कारखाने बंद झालेत, रोजगाराच्या संधीही घटल्या
या संपूर्ण घडामोडीमुळे संसद भवन परिसरात एकच खळबळ उडाली. लोकसभेचं कामकाज गदारोळामुळे आधीच तहकूब झालं होतं, त्यात या आंदोलनमुळे मराठी खासदारांची एकजूट आणि प्रतिकार पुन्हा एकदा अधोरेखित झाला. राज्यात हिंदी सक्ती आणि मराठी अस्मितेचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. अशातच मराठीसंबंधी केलेली कोणतीही अवमानजनक वक्तव्ये राजकीय आणि सामाजिक पातळीवर गंभीर स्वरूप धारण करू लागली आहेत.