Rohit Pawars direct accusation against the government : रोहित पवारांचा सरकारवर थेट आरोप
Mumbai : मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला मोठा टप्पा गाठून देणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा बांधवांचे मनापासून अभिनंदन करतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र, यानिमित्ताने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचं ते म्हणाले.
त्यांच्या मते, काल घेतलेला निर्णय सर्वमान्य होता, तर तो लोकसभा निवडणुकीपूर्वी का घेतला नाही? आंदोलनाचा इशारा तीन महिने आधी असूनही सरकारने कार्यवाही का केली नाही? न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच मंत्रिमंडळ उपसमिती सक्रीय का झाली? या सगळ्यामुळे मुंबईकरांची आणि आंदोलकांची गैरसोय ही सरकारचीच भूमिका होती का, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.
काल काढलेल्या जीआरबाबत रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, “तज्ज्ञांचं मत पाहता न्या. संदीप शिंदे समिती जे काम करत होती तेच आता हैदराबाद गॅझेट या गोंडस नावाखाली होणार आहे. म्हणजे नवीन काही नाही. त्यांच्या मते, या जीआरची खरी अंमलबजावणी झाली, वैयक्तिक दाखल्यांना प्रमाणपत्रं मिळाली, तेव्हा याची खरी परिणामकारकता दिसून येईल.
“
रोहित पवार म्हणाले, या जीआरमधील आश्वासनांची कालमर्यादा बघता, सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठीच हा खेळ करत आहे का? नवी मुंबईत आंदोलकांच्या हातावर तुरी दिल्या तशीच फसवणूक पुन्हा तर होत नाही ना? हा प्रश्न सामान्य जनतेचा आहे.
सरकारवर टीका करताना रोहित पवार म्हणाले, “या सरकारने केवळ दोन समाजात वाद लावून सत्तेची पोळी भाजली आहे. सरकारने गावगाड्यातील ओबीसी-मराठा समाजात वाद लावल्याबद्दल जनतेची माफी मागायला हवी. यापुढे शेतकरी, युवक, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर काम करणं अपेक्षित आहे.”
शेवटी त्यांनी सरकारवर टोकाचा वार करत म्हटलं, “तूर्तास ‘दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही’ हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती सुरू आहे. पण महाराष्ट्राला अशा चाणक्यनीतीची नाही, तर माणुसकीच्या नीतीची आणि महाराष्ट्र धर्माची गरज आहे.”
_____