Open chambers, cracked roads, life-threatening conditions in Nagpur : नागपूर शहराचे विदारक वास्तव; प्रशासनाचे दुर्लक्ष
Nagpur कुठे रस्त्याचे काम सुरू आहे, कुठे खड्डे पडले आहेत. तर कुठे चेंबर उघडे पडल्यामुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे. नागपूर शहरातील या विदारक वास्तवाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही वॉच ठेवला, प्रशासनाची झाडाझडती घेतली तरीही परिस्थिती बदलली नाही.
एकीकडे विकासाकडे धाव घेत असताना स्थानिक पातळीवर अनेक समस्यांना नागपूरकरांना सामोरे जावे लागत आहेत. रमणा मारुती परिसरात एक कार तुटलेल्या ड्रेनेजमध्ये फसल्याने वाहनचालकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. हे एकच उदाहरण नाही तर शहरातील इतर भागातही असेच चित्र असून वेळीच दुरुस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे.
रमना मारुती परिसरात घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा या समस्येकडे लक्ष वेधल्या गेले. शिवाजीनगर, धरमपेठ, शंकरनगर, नवीन मनीषनगर, अंबाझरी मार्ग यासारख्या भागातही ड्रेनेज उघडे असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. अनेक दिवसांपासून चेंबर उघडाच असतात. पायी जाताना एखाद्याचा पाय त्यात जाऊ शकतो. अनवधानाने वाहन रूतण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तर त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना दिसत नाही, त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो.
वाहनचालकांकडून होणाऱ्या चुकांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची बारीक नजर असते. मोठ्या दंडाचीही आकारणी केली जाते. मात्र या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष नसते का, असा संतप्त सवाल आता नागपूरकरांकडून उपस्थित केला जात आहे. प्रतापनगर परिसरातही हीच समस्या दिसून येते. मनपा प्रशासनाने रस्त्यांचे ऑडिट करून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
रस्त्यावरील उघड्या ड्रेनेज चेंबरमुळे गंभीर अपघात होत आहेत. काही ड्रेनेजचे झाकण रस्त्यापासून खाली रूतलेत. काही वरती आलेत. रात्री दुचाकीस्वाराला याचा अंदाज आल्यामुळे अपघात होतात. रस्ताखोदला जातो, डांबरीकरण होत नाही, बुजवला जात नाही. अपघातालानिमंत्रण देणाऱ्या अशा त्रुट्यांवर प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती अथवा पाण्याची पाइप बदलण्यासाठी रस्ता खोदल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने दुरुस्त केला जात नाही. माती टाकल्यानंतर वाहन ये-जा करून खड्डा अधिक खोल होतो. पाऊस आल्यानंतर त्यात पाणी साचते. वाहने रूततात. रस्ता डांबरीकरण करायला महिन्याहून अधिक काळ लोटतो.
ड्रेनेजचेंबरचे लोखंडी झाकण चोरीला जात असल्यामुळे आता सिमेंटचे झाकण बसविले जात आहेत. त्यावरून अवजड वाहन गेल्यानंतर ते खचते. त्यानंतर अपघात होतात. लोखंडी झाकण चोरीला जात असले तरी त्याचा तपास होत नाही. मनपा अधिकारी याबाबत काहीच कार्यवाही करीत नाहीत, असा रोषही नागरिकांनी व्यक्त केला.
अपघाताला निमंत्रण देणारे असे झाकण असतील तर नागरिक, महापालिका पोलिस या सर्वांनी मिळून काळजी घेतली पाहिजे. झाकण नसल्याने अपघात झाला असेल तर महापालिकेचे दुर्लक्ष म्हणावे लागेल. कायद्यानुसार त्या तरुणाला मदत दिलीच पाहिजे. कारण अपघाताला तेच जबाबदार आहेत, अशी मागणी नागरिकांनी केली.