Manoharbhai Patel created an educated generation : गुणवंत विद्यार्थ्यांचा सुर्वण पदकाने गौरव
Gondia मनोहरभाई पटेल हे स्वत: अल्पशिक्षित होते. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे कार्य गोंदिया शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीबांसाठी शिक्षणाची दारे खुली करीत संस्कारक्षम पिढी घडविण्याचे व ज्ञानदानाचे कार्य केले. त्यामुळे मनोहरभाई पटेल हे अल्पशिक्षित नव्हे तर सर्वाधिक शिक्षित होते असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केले.
मनोहरभाई पटेल यांच्या ११९ व्या जयंती निमित्त रविवारी (दि.९) स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रागंणावर गुणवंत विद्यार्थ्यांना सुर्वण पदक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते. यावेळी प्रामुख्याने जुबिलेंट लाइफसायंसेसचे व्यवस्थापकीय संचालक हरी शंकर भारतिया, माजी खा. नरेश गुजराल, उद्योजक मोहीत गुजराल, सीमा गोयल, वर्षा पटेल, आ. डॉ. परिणय फुके, विनोद अग्रवाल, उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्यात ऐवढ्या दर्जेदार शिक्षण संस्था, अत्याधुनिक प्रयोगशाळा, एवढे चांगला कॅम्प्स असेल याची कल्पना केली नव्हती. पण हे सर्व बघून खरोखरच मी धन्य झालो. खासदार प्रफुल पटेल यांच्या वडीलांनी लावलेले शिक्षण संस्थेचे छोटेसे रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. सव्वा लाख विद्यार्थी यात शिक्षण घेत आहे. ही खरोखरच गौरवाची व अभिमानाची बाब आहे.
खासदार प्रफुल पटेल त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे चालवित आहेत. जनतेत जाऊन लोकहिताची कामे करीत आहेत. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत, असे पीयूष गोयल म्हणाले. खासदार पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा सर्वांगिन विकास हेच ध्येय समोर ठेवून आणि सर्वांना सोबत घेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
अलीकडे देश विदेशातील रुग्णालयांमध्ये नर्सेसची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे गोंदिया येथे चांगल्या दर्जाचे नर्सिंग कॉलेज तसेच विविध विदेशी भाषा शिकविण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरु करावे असा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी खा. पटेल यांना दिला.