BJP MLA Krishna Khopde, Congress MLA Abhijit Wanjari’s Clash Reaches Mumbai : खोपडेंनी घेतली विधानसभा आणि विधानपरिषद अध्यक्षांची भेट
Nagpur : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. आंदोलनाचे निमित्त करत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर शाईफेक केली. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली. त्यानंतर १ सप्टेंबर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत.
आमदार खोपडे यांच्या घरासमोरील आंदोलनानंतर आमदार ठाकरे आणि आमदार वंजारी यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काही महिन्यांपूर्वीही वंजारी यांच्या कार्यालयाच्या फलकावर समाजकंटकांनी आक्षेप घेत निदर्शने केली होती. त्यासंदर्भात २२ जणांची नावे पोलिसांना देण्यात आली होती. पण कोणताही कारवाई न केल्याने त्यांचे मनोबल वाढले, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. दरम्यान आमदार खोपडे यांनीही याच संदर्भात पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती.
आता आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांना याच संदर्भात निवेदन दिले आणि चर्चा केली. अभिजित वंजारी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे सदस्य आहेत. विधानसभेचे आमदार आणि विधानपरिषदेचे सदस्य यांची संविधान, निवडणूक आयोग आणि जनप्रतिनिधी कायद्यान्वये सीमा ठरलेली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विधानसभा सदस्य म्हणून एकच आमदार राहतो.
Maratha Reservation : एका जीआरने मराठ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत
आमदाराला संविधानिक अधिकार आहे. परंतु अभिजित वंजारी यांनी कायद्याची पायमल्ली करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी हेतुपुरस्सर ‘आमदार अभिजित वंजारी पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र’ असा उल्लेख फलकावर केला आहे. याच्या विरोधात लकडगंज पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही, असे आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभा आणि विधानपरिषद अध्यक्षांना सांगितले. त्यावर आता काय कार्यवाही होते, याकडे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.