यवतमाळ
Expectations from the Minister of State for Industries : उद्योग राज्यमंत्री लक्ष देणार का?; अपेक्षा वाढल्या, उद्योजकांना प्रोत्साहनाची गरज
Yavatmal जिल्ह्यातील पुसद शहर राज्यात महत्त्वाचे राजकीय केंद्रबिंदू राहिले आहे. यवतमाळनंतर दुसऱ्या क्रमांकाची 450 एकरावरील एमआयडीसी MIDC येथे आहे. मात्र, एमआयडीसीत अद्याप पायाभूत सुविधांची वाणवा आहे. याच क्षेत्राचे आमदार उद्योग राज्यमंत्री झाल्याने एमआयडीसीला आता तरी उभारी मिळेल काय?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इंद्रनील नाईक यांच्या रूपाने पुसदला उद्योग राज्यमंत्रिपद मिळाले. त्यामुळे पुसदकरांसह जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहे. पुसद एमआयडीसीमधील विविध समस्यांचे निराकारण करून ते नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम करतील, अशी अपेक्षा आहे. पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यासाठी पुष्पावंती इंडस्ट्रीज असोसिएशन व लघु उद्योग भारती संघटनेकडून प्रयत्न सुरू आहेत.
शासनाचे उद्योगांविषयीचे धोरण, चोऱ्यांचे वाढते प्रमाण, भूखंड हस्तांतरणाच्या अडचणी आदी प्रश्न सोडवावे लागणार आहेत. पुसद एमआयडीसीत 259 भूखंड आहेत. त्यापैकी केवळ 80 भूखंडांवर उद्योग सुरू आहेत. त्यातीलही 50 टक्के उद्योग बंद आहेत. त्यात एमआयडीसीतील 108 एकर जमीन सौरऊर्जा प्लॅन्टसाठी परराज्यातील एका कंपनीला दिली आहे. त्यावर 70 टक्के काम झाल्याची माहिती आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव जागा इतर प्रकल्पांना हस्तांतरण करता येते काय? हा प्रश्न आहे.
याबाबत पुसद एमआयडीसीतील औद्योगिक भूखंड सौरऊर्जा प्रकल्पासाठी दिला असल्यास आपल्याला माहिती नाही. प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी लागेल, असे एमआयडीसीच्या अमरावती विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पुसद एमआयडीसीतील विविध समस्यांचे निराकरण करून सुरू उद्योगांना न्याय देण्यात येईल. तसेच नवे उद्योजक यावेत यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी सुरू केलेली एमआयडीसी प्रगतिपथावर नेण्यासाठी तसेच तालुक्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली आहे.
दुसरीकडे उद्योजकांच्या प्रगतीत अडसर ठरणारे रस्ते, वीज, पाणी, नाल्या, उद्योगांची सुरक्षा आदी अनेक समस्या असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्याचे निराकरण होते की नाही, याचा पाठपुरावा करण्यासाठी एखादी यंत्रणा असावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.