Raj Thackeray : आता आंदोलन थांबवायला हरकत नाही !

 

Raj Thackeray’s letter to workers, says organizational strength has been seen : राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्र, म्हणाले संघटनात्मक ताकद दिसली

 Mumbai : मराठी भाषेचा वापर व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ‘खळ खट्याक..’ आंदोलन करण्यात आले. यादरम्यान बॅंकेच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी मारहाणही केली गेली. पण ‘आता आंदोलन थांबवायला हरकत नाही..’, असे पत्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लिहिले आहे.

पत्रामध्ये राज ठाकरे म्हणतात, सर्वदूर असलेली पक्षाची संघटनात्मक ताकदही दिसली. आता आंदोलन थांबवयला हरकत नाही. मराठी भाषेचा आग्रह धरला हे चांगलं झाले. शासकीय आस्थापनांत जेथे मराठीचा वापर होत नव्हता, तेथे कार्यकर्त्यांनी धडक दिली, ही चांगली बाब झाली. पण आता आंदोलन थांबवायला हरकत नाही.

पत्रात नेमकं काय ?
पत्रात राज ठाकरे लिहितात, ‘मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की, महाराष्ट्रातील बॅंकांमध्ये मराठीत व्यवहात होत आहेत की नाही हे पहा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बॅंकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बॅंकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही, हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.

CM Devendra Fadnavis : राज ठाकरे मित्र आहेत; उद्धव ठाकरे शत्रू नाहीत !

 

पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची?

Raj Thackeray : मराठीचा मुद्दा, राज ठाकरेंचा गुद्दा!

सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बॅंकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही. पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर मग रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का? तुम्ही बॅंकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही, हे नक्की.

महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा. पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांची चर्चा करायला अवश्य जातील.’