Ex-MP will go to court against the Mahayuti manifesto : शेतकऱ्यांच्या दिशाभूल प्रकरणी न्यायालयीन लढा देणार
Buldhana “महायुतीने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. त्यांच्या जाहीरनाम्यातील खोट्या आश्वासनांविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत,” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी चिखली येथे दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार DCM Ajit Pawar यांनी अलीकडेच राज्याची आर्थिक स्थिती बेताची असल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शक्य नसल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना शेट्टी म्हणाले, “मग निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन का दिलं? ही सरळ सरळ फसवणूक आहे. यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहोत.”
Shweta Mahale : बुलढाण्यातही आमदारांच्या घरापुढे पेटवले टेंभे!
शेट्टी पुढे म्हणाले, “अजित पवार हे नवखे राजकारणी नाहीत. गेले ११ वर्षे तेच अर्थखाते सांभाळत आहेत. त्यांना राज्याच्या आर्थिक स्थितीची पूर्ण कल्पना होती. तरीही निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासने देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ आहे.”
महाविकास आघाडीने तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, तर महायुतीने संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे वचन दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर हेच सरकार आपल्या आश्वासनांपासून पळ काढत असल्याची टीका त्यांनी केली.
शेट्टी यांनी कैलास नागरे या शेतकऱ्याच्या आत्महत्येवरही संताप व्यक्त केला. “खडकपूर्णा धरणातून पूरस्थितीत पाणी सोडायचे होते, जे लाभक्षेत्राबाहेरील नागरे यांच्या शेतीसाठी उपयुक्त ठरले असते. मात्र प्रशासनाच्या हेकटपणामुळे एका उमद्या शेतकऱ्याचा जीव गेला,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. “मंत्र्यांचे जिथे जिथे कार्यक्रम होतील, तिथे जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी संघटनेचे अनिल वाकोडे, संतोष परीहार, दामू इंगोले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.