Shiv Sena Workers Erupt in Protest : वणीत उबाठाचा गनिमी कावा, पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर घातले लोटांगण

Uddhav Balasaheb Thackeray Faction Ambushes Rival, Road Block Laid Before Guardian Minister’s Vehicle : एकाच वेळी वाहनासमोर घेतली धाव, पोलिसही गोंधळले

Wani – Yavatmal : मागील महिन्यात पावसाने कहर केला. अख्खा महाराष्ट्र धुवून काढला. अतिवृष्टीमुले राज्यातील जवळपास ३० जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी तर शेतजमीन खरवडून गेली. पण सरकारने अद्यापही शेतकऱ्यांना मदत दिली नाही. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही पूर्ण केले नाही. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलन करण्यात आले.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. अशोक उईके यांना शिसैनिकांनी काळे झेंडे दाखवले. वणी येथे आढावा बैठकीसाठी आले असता पालकमंत्री उईके विश्रामगृहावरून बैठकस्थळी जात होते. दरम्यान बसस्थानकासमोर उबाठाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून आदिवासी विकास मंत्री उईके आणि सरकारचा निषेध करण्यात आला.

OBC Reservation : १० ऑक्टोबरचा मोर्चा मागे घ्या, मुख्यमंत्र्यांची विनंती !

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सोयाबीनला विशेष पॅकेज जाहिर करा, अशा घोषणा देत सरकारचा निषेध करून शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या वाहनासमोर लोटांगण घातले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. कारण या आंदोलनासाठी शिवसैनिकांना गनिमी काव्याचा वापर केला.

Nitesh Rane : जिल्हा बँक कर्ज घोटाळ्यात नितेश राणेंवर थेट आरोप

शिवसैनिक काळे झेंडे घेऊन एकाच वेळी आदिवासी विकास मंत्र्यांच्या वाहनासमोर धावले. त्यामुळे काही काळ पोलिसांनाही काही सुचले नाही. पोलिस काही हालचाल करतील, तोपर्यंत शिवसैनिकांनी काळे झेंडे फडकावून पालकमंत्र्यांच्या वाहनासमोर लोटांगण घातले होते. यानंतर जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुकाप्रमुख विनोद ढुमणे, शहरप्रमुख सुधीर थेरे, गिता उपरे यांच्यासह इतर शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. शिवसैनिकांनी गनिमी काव्याने हे आंदोलन यशस्वी केले.