Demand that a Marathi man should become the Prime Minister : सामाजिक न्याय देण्याची ताकद मराठी माणसातच, अमरावतीत पत्रकार परिषद
Amravati “देशाला खरा सामाजिक न्याय फक्त मराठी माणूसच देऊ शकतो, म्हणून भारताचा पुढील पंतप्रधान हा मराठीच असावा,” अशी मागणी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते शिवा अय्यर यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत केली. मुंबईमध्ये सामाजिक कार्यात सक्रीय असलेले शिवा अय्यर हे स्वतः तामिळ असले तरीही मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, यासाठी ते अभियान राबवत आहेत.
अय्यर यांनी सांगितले की, देशावर जेव्हा-जेव्हा संकट आले, तेव्हा मराठी माणूस दिल्लीच्या मदतीसाठी धावून गेला आहे. मात्र, आजवर एकाही मराठी व्यक्तीला पंतप्रधानपद मिळालेले नाही. हे अन्यायकारक असून, आता महाराष्ट्रीयन पंतप्रधान व्हावा, यासाठी ते राज्यभर जनजागृती करत आहेत.
Chandrashekhar Bawankule : मुंबईपाठोपाठ आता अमरावती–पुणे विमानसेवा; पालकमंत्र्यांचा शब्द
शिवा अय्यर हे तमिळ भाषिक असून, गेल्या ५० वर्षांपासून डोंबिवलीत वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी झाल्याने मराठी माणूस व राज्याबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा आहे. “फक्त महाराष्ट्रच सामाजिक न्यायाची खरी अंमलबजावणी करू शकतो,” असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
या जनजागृती मोहिमेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र आणि संसदेचे चित्र असलेला मोठा फलक तयार केला आहे. त्यावर त्यांनी लिहिले आहे — “भारताचा पुढील पंतप्रधान महाराष्ट्रीयन असावा. उत्तर प्रदेशला ११ वेळा, गुजरातला ४ वेळा संधी मिळाली. पंतप्रधानांची नियुक्ती रोटेशन पद्धतीने व्हावी.”
अय्यर एसटी आणि रेल्वेने प्रवास करत जिल्हाधिकारी कार्यालये, रेल्वे स्थानके व बसस्थानके येथे नागरिकांना हा फलक दाखवत जनजागृती करत आहेत.
त्यांच्या मोहिमेचे टप्पे पुढीलप्रमाणे पार पडले —
पहिला टप्पा (२०-२१ जून) : ठाणे, पालघर, नाशिक
दुसरा टप्पा (२६-२८ जून) : जळगाव, नंदुरबार, धुळे, जालना, औरंगाबाद
तिसरा टप्पा (१०-१२ जुलै) : नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, लातूर
चौथा टप्पा (६-९ ऑगस्ट) : गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती
अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोहिमेचा आढावा घेतला आणि राज्यभरातून मिळत असलेल्या जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची माहिती दिली. अय्यर यांनी सांगितले की, पाचवा टप्पा २०, २१, २२ ऑगस्ट रोजी सोलापूर, सातारा, सांगली, पुणे आणि अहिल्यानगर येथे होणार आहे. पत्रकार परिषदेला शिवा अय्यर व विनय नांदुरकर उपस्थित होते.