Houseful Response to Mungantiwar’s Jan Sampark Drive : केवळ जनसंवादाचा कार्यक्रम नाही, तर समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग
Chandrapur : राजकारण हे जनतेची सेवा करण्याचे माध्यम आहे. केवळ २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण, या पद्धतीने काम करणे, हे राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष राहिले आहे. मंत्री असताना मागेपुढे वाहनांचा ताफा आणि गर्दी असणे स्वाभाविक आहे. पण एखादा पुढारी एकदा का नामदार चा आमदार झाला तर त्याच्या सभोवतालची गर्दी कमी होताना दिसते पण आमदार सुधीर मुनगंटीवार मात्र त्याला अपवाद ठरले आहेत.
आमदार मुनगंटीवार मागील सरकारमध्ये राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री असताना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. दरम्यान काही काळ गोंदिया जिल्ह्याचे पालकत्वही त्यांच्याकडे देण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यासोबत त्यांनी गोंदियालाही तेव्हा तेवढाच वेळ देऊन तेथील विकास कामे मार्गी लावली होती. आज ते मंत्री नाहीत. पण तरीही त्यांच्या सभोवतालचा गोतावळा तसुभरही कमी झालेला नाही. त्यांच्या कामांचा धडाका आजही तेवढाच आहे. आपल्या बल्लारपूर या मतदारसंघासह राज्यभरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आजही विधानसभेत त्यांचा तो बुलंद आवाज घुमतो.
सुधीर मुनगंटीवार यांच्या कामांच्या धडाक्यात आणि त्यांच्या लोकप्रियतेत कुठेही कमी झालेली नाही, हे आज (२९ सप्टेंबर) त्यांच्या जनसंपर्क कार्यक्रमातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. चंद्रपुरातील गिरनार चौक येथील कार्यालयात आज (२९ सप्टेंबर) त्यांचा जनसंपर्क कार्यक्रम होता. रस्ते, अतिक्रमण, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान,निराधार योजना, प्रबंलित अनुदान, महावितरण आदी विभागांतील असंख्य कामे घेऊन नागरिकांनी त्यांच्या कार्यालयात गर्दी केली. यावेळी मुनगंटीवार यांचा जनसंपर्क म्हणजे हाऊसफुल्ल गर्दी, याची प्रचिती पुन्हा एकदा आली.
Sudhir Mungantiwar : पोंभूर्णा होणार राज्यातील आदर्श तालुका !
जनतेच्या अपेक्षा आणि प्रश्नांना प्राधान्य देऊनच खरी लोकसेवा साध्य होते, हेच आमदार मुनगंटीवार यांनी आज पुन्हा सिद्ध केले. जनसंपर्क हा केवळ संवादाचा किंवा लोकप्रियता मिळवण्याचा कार्यक्रम नाही, तर जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याचा परिणामकारक मार्ग असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मंत्रीपदावर असताना जनसंपर्क कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होणे, स्वाभाविक आहे. पण आज ते मंत्री नाहीत, तर आमदार आहेत. तरीही राज्यभरातून लोक आपआपली कामे घेऊन त्यांच्याकडे धाव घेत आहेत. हे त्यांच्यातील लोकनेत्याचे आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास याचे प्रतिक आहे.
प्रचंड अनुभव, उच्च शिक्षण आणि जनतेच्या समस्यांची बारकाईने जाण असलेले सुधीर मुनगंटीवार हे केवळ जनतेच्या समस्यांची नोंद घेत नाहीत, तर अधिवेशनात सभागृहातील संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून जनतेला न्याय मिळवून देतात. आज राज्यभरातील प्रभावी नेत्यांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. जनतेच्या मनातील विश्वास, प्रश्नांना तातडीने न्याय आणि लोकनेत्याच्या संवेदनशीलतेचा मिलाफ म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा जनसंपर्क कार्यक्रम, हे विशेषत्वाने नमूद करावे असेच आहे.








