Remembering the historic work of Mungantiwar on Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : उपक्रमच नव्हे तर भविष्यातील पिढ्या लक्षात ठेवतील इतके कार्य
Nagpur : महाराष्ट्राच्या इतिहासात २०२२ ते २०२४ ही दोन वर्ष कुणालाही विसरता येणारी नाहीत. त्याला कारण आहेत राज्याचे माजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले कार्य. दोन वर्षे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यापासून भारत-पाकिस्तानच्या सीमेवर कुपवाडापर्यंत आणि त्याहीपलीकडे महाराजांची वाघनखं ठेवलेल्या लंडनच्या संग्रहालयापर्यंत. प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष झाला. शिवचरित्राचा प्रसार झाला. आणि हे केवळ सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने या घटनांची आठवण केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केवळ आपल्या भाषणांमध्येच न करता त्याहीसमोर त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी झपाटल्यासारखं काम सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष एका सोहळ्यात साजरे करून सोडले नाही. तर अख्खे वर्ष वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. फक्त उपक्रमच नव्हे तर भविष्यातील पिढ्या लक्षात ठेवतील, असे कामही केले.
सर्वांत पहिले प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीवर हथोडा पडला. अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण १० नोव्हेंबर २०२२ रोजी मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वन विभागामार्फत हटविण्यात आले. त्यानंतर आग्र्यातील ज्या ‘दिवाण-ए-खास’मध्ये औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला होता. त्याच ठिकाणी १९ फेब्रुवारी २०२३ ला शिवजयंती उत्सव साजरा केला.
प्रतापगडावरील भवानी माता मंदिराला चांदीचे छत्र अर्पण करणे असो अथवा शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील पवित्र जल गोळा करणे असो. महाराजांवरील श्रद्धेमुळे मुनगंटीवारांच्या कल्पनांनी अक्षरशः भरारी घेतली होती. त्यानंतर २ जून २०२३ ला रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा जगभरातील शिवभक्तांनी अनुभवला. ३५०वा राज्याभिषेक दिन सोहळा बघून अख्खा महाराष्ट्र भारावला.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ७ नोव्हेंबर २०२३ रोजी बसविण्यात आला. मुनगंटीवारांच्या पुढाकारामुळेच हे साध्य होऊ शकले. पाकिस्तानच्या दिशेने असलेली महाराजांची तलवार बघितली की ‘हर हर महादेव’ हे शब्द ओठांतून निघाल्याशिवाय राहात नाहीत.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे झालेले शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, मंत्रालयात दररोज होणारे शिवविचार प्रसारण, मॉसाहेब जिजाऊ जयंती दिनानिमित्त सिंदखेडराजा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, प्रत्येक जिल्ह्यात महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे आयोजन, आंध्रप्रदेशातील श्रीशैल्यम येथे महाराजांचे ध्यान मंदिर बांधण्यासाठी ३ कोटी ३८ लाख रुपयांची मदत करणे… यांसारखी अनेक कामे मुनगंटीवारांनी केली.
Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंसारखा विकासासाठी Passionate नेता बघितला नाही!
..आणि वाघनखे भारतात आली
महाराजांनी ज्या वाघनखांचा वापर करून अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखे लंडनच्या संग्रहालयात होती. मुनगंटीवारांनी ती वाघनखे भारतात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. अनेक अडचणी आल्या. पण निराश न होता जिद्द कायम ठेवली. लंडनच्या संग्रहालयात पोहोचले. ३ ऑक्टोबर २०२३ ला लंडनमध्ये जाऊन सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ही ऐतिहासिक वाघनखे १९ जुलै २०२४ ला साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल झाली. तेव्हा मुनगंटीवारांसह अख्ख्या महाराष्ट्रातील शिवभक्तांना आनंदाश्रू लपवता आले नाहीत. आज शिवजयंती साजरी होत असताना गेल्या दोन वर्षांमध्ये मुनगंटीवार यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याची महाराष्ट्रभरात आवर्जून चर्चा होत आहे.