Unique movement throwing away lungi-banyan, playing cards, fake money : लुंगी – बनियन, पत्ते, नकली पैसे उधळत अनोखे आंदोलन
Mumbai : महायुती सरकारमधील वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले. महायुतीतील काही मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप आणि वादग्रस्त विधाने झाल्यानंतर ठाकरे गटाने ‘कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घ्या’ या मागणीसाठी विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
डोंबिवलीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बनियन आणि लुंगी परिधान करून रस्त्यावर पत्ते खेळणे, बॉक्सिंग करणे अशा प्रतीकात्मक प्रकारांद्वारे निषेध नोंदवला. ‘बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा’ अशी मागणी यावेळी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली. कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
Mandal Yatra : ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये हाच हेतू !
अमरावतीत कार्यकर्त्यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मुखवटा घालून डान्स केला आणि त्यांच्यावर नकली पैसे उधळले. या प्रकारातून त्यांनी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे प्रतीकात्मक आरोप व्यक्त केले.
ठाण्यात आंदोलन स्थळी कार्यकर्त्यांनी पैशाने भरलेली बॅग आणून निषेध केला. आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेवरून एका कार्यकर्त्याने लुंगी आणि हातात ग्लब्स घालून निषेध व्यक्त केला.
पुण्यात भरत गोगावले, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे आणि गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी करत जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी अनोखी वेशभूषा केली होती आणि ‘ओम फट स्वाहा’च्या घोषणा देत वातावरण तापवले.
Vijay Wadettiwar : एसआयटी नेमली म्हणजे कारवाई झाली असं नाही !
बीडमध्ये अण्णाभाऊ साठे चौकात तासभर रास्ता रोको करण्यात आला. शिंदे गटातील वादग्रस्त मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी आरोप केला की, भ्रष्टाचार आणि बेजबाबदार वर्तनामुळे राज्याच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. राज्यभरातील या आंदोलनातून ठाकरे गटाने स्पष्ट केले की, वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई न झाल्यास पुढील काळात संघर्ष आणखी तीव्र केला जाईल.