Shiv Sena criticizes government for abolishing cotton import duty : कापूस आयात शुल्क रद्द केल्यावरून नेत्यांची टीका
Buldhana केंद्र सरकारने परदेशातून आयात होणाऱ्या कापसावरील सीमा शुल्क रद्द करण्याचा घेतलेला निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून या निर्णयावर तीव्र टीका करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रवक्ता जयश्री शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला.
“देशातील शेतकऱ्यांच्या हिताची फिकीर न करता मोदी सरकार परदेशी व्यापाऱ्यांच्या दबावाखाली वागत आहे,” असा आरोप करत त्यांनी या निर्णयाचा जोरदार निषेध व्यक्त केला. शेळके म्हणाल्या की, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ बॉम्ब’समोर मोदी सरकार नतमस्तक झालं आहे. परिणामी, कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यात आलं असून, या निर्णयामुळे अमेरिकन निर्यातदारांची तिजोरी भरली जाणार असली तरी भारतीय शेतकऱ्यांचे पांढरे सोनं मातीमोल होईल, असा इशारा त्यांनी दिला.
Heavy rains : बुलढाण्यात अतिवृष्टीचा कहर; तातडीच्या मदतीची मागणी
शेळके यांनी आणखी स्पष्ट केलं की, हा निर्णय देशातील अन्नदात्यांच्या संकटात भर घालणारा आहे. “सरकारने शेतकऱ्यांच्या मेहनतीचा विचार करण्याऐवजी परदेशी व्यापाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे,” असे त्यांनी म्हटले.
राज्यातील राजकीय वातावरण या मुद्द्यावरून चांगलेच तापण्याची शक्यता असून, शेतकरी संघटनाही आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्राच्या धोरणाविरोधात राज्यात आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही. या घडामोडींमुळे आगामी काळात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राज्यात मोठे राजकीय रण पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.