A farmer who has been waiting for a solar pump climbs a tower to protest : मेहकरच्या महावितरण कार्यालयात चांगलीच खळबळ; प्रशासनाच्या दिरंगाईवर संतप्त प्रतिक्रिया
Mehkar ‘सरकार योजना देते, पण अंमलबजावणी कोण करणार?’ — असा संतप्त सवाल विचारत भोसा येथील शेतकरी विष्णू जयराम चंदनसे यांनी शुक्रवारी थेट महावितरणच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं. सौर कृषी पंपासाठी तब्बल ८ महिने आधी पैसे भरले, पण अजूनही पंप मिळालेला नाही, यामुळे या शेतकऱ्याच्या संयमाचा बांध अखेर फुटला.
दागिने विकले, पण पंप काही आला नाही!
शासकीय सौर कृषीपंप योजनेत सहभाग घेण्यासाठी चंदनसे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून शुल्क भरले होते. काहींनी तर घरातील दागिने विकून पैसे उभे केले. मात्र, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आठ महिने उलटून गेले तरीही सौर पंपाचे कनेक्शन मिळालेले नाही.
शुक्रवार, ११ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता, चंदनसे यांनी मेहकर येथील महावितरण कार्यालयाच्या मागील टॉवरवर चढून सुमारे तीन तास आंदोलन केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांची गर्दी झाली आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली.
प्रशासन केवळ संयम संपेपर्यंतच ऐकते?
उपकार्यकारी अभियंता कळसकर आणि इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची समजूत घालून आंदोलनाचा शेवट केला. मात्र, शेतकऱ्याच्या या टोकाच्या कृतीमुळे शासन आणि महावितरणच्या अकार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
“शेतकऱ्यांना घोषणा नाही, अंमलबजावणी हवी,” असा सूर यावेळी अनेकांनी व्यक्त केला.